Breaking News

जलयुक्त शिवार योजनेत प्रचंड भ्रष्टाचार : सचिन सावंत


मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे बोलताना महाराष्ट्रातील 16 हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत व 9 हजार गावे दुष्काळ मुक्त होण्याच्या मार्गावर आहेत असे जाहीर केले. परंतु, राज्यात जवळपास 201 तालुक्यातील किमान 20 हजार गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. पंतप्रधान सवयीप्रमाणे खोटे बोलत आहेत. परंतु, राज्यात जलयुक्त शिवार योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली.
राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार योजनेवर 7 हजार 459 कोटी रूपये खर्च करण्यात आले. या अभियानाअंतर्गत 5 लाख 41 हजार 91 कामे पूर्ण झाली व 20 हजार 420 कामे प्रगतीपथावर आहेत असे म्हटले गेले आहे. या अभियानामुळे टँकरच्या संख्येत 80 टक्के घट झाल्याची वल्गना सरकारतर्फे करण्यात आली. पण यंदा ऑक्टोबर महिन्यातच राज्याच्या विविध भागात शेकडो टँकर सुरु आहेत हे समोर आले आहे.

राज्य सरकारला भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून वेळोवेळी राज्यातील भूजल पातळीच्या संदर्भातील अहवाल देण्यात येतो. सप्टेंबर 2018 च्या अखेरीस व ऑक्टोबर महिन्यात या यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षापूर्वीच्या तुलनेत राज्यातील एकूण 353 तालुक्यांपैकी 252 तालुक्यांमधील 13 हजार 984 गावातील भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आली आहे. त्यापैकी 3 हजार 342 गावांमध्ये 3 मीटरपेक्षा जास्त, 3 हजार 430 गावांमध्ये 2 ते 3 मीटर व 7 हजार 212 गावांमध्ये 1 ते 2 मीटरने भूजल पातळी घटली आहे. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीत पाणी नव्हे तर भ्रष्टाचार मुरला आहे हे स्पष्ट आहे. साडेसात हजार कोटी रूपये कोणाच्या घशात गेले? हे जनतेसमोर आलेच पाहिजे. जलयुक्त शिवार योजना भ्रष्टाचाराचा मालयुक्त शिवार झाली आहे, अशी टीका करताना यातून भाजपचे नेते व भाजपशी संबंधित ठेकेदार यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे असे सावंत म्हणाले. या जलयुक्त शिवाराच्या कामांची न्यायिक चौकशी झाली पाहिजे, तसेच सरकारने दुष्काळमुक्त म्हणून जाहीर केलेल्या 16 हजार गावे व दुष्काळ मुक्तीच्या मार्गावर असलेल्या 9 हजार गावांचे नावे तात्काळ जाहीर करावीत, अशी मागणी सावंत यांनी केली. महाराष्ट्रातील जनताच आपल्या गावाची नावे यादीत पाहून भ्रष्टाचाराचे माप सरकारच्या पदरात घालेल असे म्हणाले.