परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना जनसंघर्ष यात्रेत पाठविले; अभाविपच्या गणपुलेने केला आरोप
संगमनेर प्रतिनिधी
येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची पूर्वनियोजित परीक्षा रद्द करून ती पुढे ढकलली गेली असल्याचे सांगितले. दरम्यान, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका व्हाट्सअप ग्रुपवर स्वतः एका शिक्षकाने विद्यार्थ्यांची पूर्वनियोजित परीक्षा रद्द केली असल्याचे लिहून विद्यार्थ्यांनी आज दि. ९ सकाळी साडेनऊ वाजता विना गणवेश आणि विना ओळखपत्र जनसंघर्ष यात्रेत होणाऱ्या सभेच्या ठिकाणी येण्याचा आदेश दिल्याचा आरोप अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इशान गणपुले यांने केला आहे.
यासंदर्भात गणपुले याने सोशल मिडियाच्या माध्यमातून हा आरोप केला आहे. यात त्याने म्हटले आहे, शिक्षणाच्या मंदिरात राजकीय स्वार्थापोटी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचे नुकसान होत आहे. जनसंघर्ष यात्रा ही समाजातील सर्व घटकांसाठी आहे. तशीच ती विद्यार्थ्यांचीदेखील होती. विद्यार्थ्यांनी जनसंघर्ष यात्रेस सामील व्हावे, यासाठी एनएसयुआयच्या वतीने सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवाहन केले होते.
दरम्यान, हा तर विद्यार्थीप्रेमाचा खोटा आव आहे, असा खुलासा एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा यांनी केला आहे. ते म्हणाले, अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांना सभेस येण्याची सक्ती केली, हा खोडसाळपणा आहे. एका प्रकारे या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. विद्यार्थीहिताचा एकही निर्णय भाजप सरकारने घेतलेला नाही. भाजप आता विद्यार्थीप्रेमाचा खोटा आव आणत आहे.
Post a Comment