Breaking News

दरवाढीचा असाही निषेध; तांबेंनी फासले मोदींच्या छायाचित्राला काळे


।संगमनेर / प्रतिनिधी।

राज्यासह देशात इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. आज दि. ११ संगमनेर येथे सत्यजित तांबे यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह एका पेट्रोल पंपावर जाऊन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेल्या जाहिरातीच्या पोस्टरला काळे फासले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना तांबे म्हणाले, की इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दरकपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग आणण्यापेक्षा सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा जीएसटीमध्ये समावेश करावा. राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढीसंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील दरवाढीचा जो संदर्भ भाजपकडून दिला जातो आहे, तो धादांत खोटा आहे. भाजप सरकारने मे २०१४ पासून १२ वेळा पेट्रोल व डिझेलवर केंद्रीय उत्पादन शुल्क वाढवून करदात्यांना लुटले आहे. याशिवाय पेट्रोलियम उत्पादनावरील कस्टम्स ड्यूटीमध्ये अनेक पटीने वाढ केली आहे. २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रूड तेलाच्या किंमती प्रति बॅरल १०७ डॉलर्स होत्या. सध्याच्या किंमती ७२ डॉलर्स प्रति बॅरल आहेत. गत चार वर्षांतील सरासरी किंमत ५० डॉलर्स प्रति बॅरल आहे, म्हणजे यूपीएपेक्षा ५५ टक्के कमी किंमत होती. तरीही इतिसातील सर्वाधिक दराने आज पेट्रोल डिझेल विकले जाते, ही सामान्य माणसाची लूट आहे.

यावेळी निखिल पापडेजा, आनंद वर्पे, नूरमोहम्मद शेख, योगेश जाजू, अनिस शेख, गौरव डोंगरे, निलेश शिंदे, बाळासाहेब गुंजाळ, सुहास आहेर, नितीन अभंग, दत्तू कोकणे, अफजल शेख, संतोष मांडेकर, रमेश नेहे, अंबादास आहेर, वैष्णव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, सचिन खेमनर, प्रतीक शिंदे, अमित गुंजाळ, विजय उदावंत, सोमा गडाख, अनिल गोर्डे, महेंद्र गुंजाळ, पांडुरंग खेमनर, तुषार वनवे, सत्यम खेमनर, लाला दायमा, खालिद मिर्जा, परबत शिंदे, सागर कानकाटे, अक्षय दिघे, रमेश दिघे, अमित मंडलिक, निलेश शिंदे, सादिक तांबोळे, शिवाजी जगताप, मुस्ताक शेख, सोपान डोळझाके, सोमनाथ गुंजाळ आदींसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.