नेते आणी पंटर!


बहुजनांनो.... !
मला माझे अनेक मित्र व हितचिंतक समजावून सांगतात की, एवढ्या कडक भाषेत नका बोलत जाऊ? कार्यकर्ता दुखावतो! परंतू या मित्रांना हे कळत नाही की, किती दिवस प्रेमाने, ओंजारून गोंजारून प्रबोधन करायचे? अलिकडे सामाजिक कार्याची व्याख्या व उद्देशच बदलून गेले आहेत. निवडणूक जवळ आली की सामाजिक संघटनांचे पेव फुटते. दादा, आण्ना, भाऊ यांचे कार्यक्रम होऊ लागतात. गल्ली-बोळातले छपरी पोरं कार्यकर्ते म्हणून मिरवायला लागतात. कार्यक्रम आयोजित करणारे, कार्यक्रमाला गर्दि जमविणारे, प्रमुख पाहुणे, हार-तुरे, नारळ-उपरणी-शाली, फेटे-पगड्या, फूल-गुच्छ असा सर्व धुमाकूळ असतो. मोठ्या साहेबांच्या पायाला लागणारे, साष्टांग नमस्कार घालणारे, पायावर डोके ठेवणारे अशी सर्व लाचार बांडगुळे कार्यक्रमात मिरवून घेत असतात. भाषणात मोठ्यासाहेबांचं गुणगाण किळस आणणारे असते. ‘मोठे साहेब नसते तर हे झाले नसते.... ते झाले नसते.... मोठे साहेब आहेत म्हणून मी ...... झालो!’
काल एका ओबीसी महिला आघाडीच्या अध्यक्षांचा फोन आला. ओबीसी महिला मेळावा घेत आहोत, आपण उपस्थित राहावे, अशी विनंती त्या फोनवरून करीत होत्या. ‘मेळावा महिलांचा आहे, तेथे माझं काय काम?’ -माझा प्रतिप्रश्‍न! तर मॅडम म्हणाल्या, ‘आपण प्रमुख वक्ते म्हणून या!’ मी म्हटलं, मी किमान एक तास बोलेन! ‘नाही, नाही, एवढा वेळ देता येणार नाही! -मॅडम! ‘किमान अर्धा तास’ -माझा आग्रह! शेवटी मॅडम म्हणाल्या की, या महिला मेळाव्याला ‘मोठे साहेब’ येत आहेत. त्यामुळे बरेच राजकिय पुढारी येतील, त्यामुळे तुम्हाला वेळ देता येणार नाही! मॅडम ने असे स्पष्टीकरण दिल्यावर मी भडकलोच! त्यांना कडक शब्दात सुनावले. मला काय शोभेचा बाहुला समजलात काय स्टेवर सजवायला? की एखादा लाचार राजकारणी, जो निमंत्रण नसतांनाही मोठ्या साहेबांसमोर मिरविण्यासाठी तडफड करतो? माझे नाव कार्यक्रम पत्रिकेत छापायचे नाही, यापुढे असे फालतू निमंत्रणही द्यायचे नाही.

मला माझे अनेक मित्र व हितचिंतक समजावून सांगतात की, एवढ्या कडक भाषेत नका बोलत जाऊ? कार्यकर्ता दुखावतो! परंतू या मित्रांना हे कळत नाही की, किती दिवस प्रेमाने, ओंजारून गोंजारून प्रबोधन करायचे? अलिकडे सामाजिक कार्याची व्याख्या व उद्देशच बदलून गेले आहेत. निवडणूक जवळ आली की सामाजिक संघटनांचे पेव फुटते. दादा, आण्ना, भाऊ यांचे कार्यक्रम होऊ लागतात. गल्ली-बोळातले छपरी पोरं कार्यकर्ते म्हणून मिरवायला लागतात. कार्यक्रम आयोजित करणारे, कार्यक्रमाला गर्दि जमविणारे, प्रमुख पाहुणे, हार-तुरे, नारळ-उपरणी-शाली, फेटे-पगड्या, फूल-गुच्छ असा सर्व धुमाकूळ असतो. मोठ्या साहेबांच्या पायाला लागणारे, साष्टांग नमस्कार घालणारे, पायावर डोके ठेवणारे अशी सर्व लाचार बांडगुळे कार्यक्रमात मिरवून घेत असतात. भाषणात मोठ्यासाहेबांचं गुणगाण किळस आणणारे असते. ‘मोठे साहेब नसते तर हे झाले नसते.... ते झाले नसते.... मोठे साहेब आहेत म्हणून मी ...... झालो!’ वगैरे वगैरे भाषणे लांबत जातात. या सर्व लाचारांच्या फौजेत एखाद्या व्यक्तीला प्रमुख वक्ता म्हणून बोलावले असेल तर तो बिचारा स्टेजच्या एका कोपर्यात कुठेतरी अंग चोरून बसलेला असतो व केव्हा आपल्या भाषणाचा पुकारा माईकवरून होईल याची वाट पाहात असतो. मध्येच एखादा पडलेला नगरसेवक सभागृहात आपल्या लवाजम्यासह प्रवेश करतो व कोणालाही न विचारता डायरेक्ट मोठ्या साहेबांजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आधीचे स्टेजवर बसलेले पाहुणे लटकेच या, या म्हणतात, पण जागेवरून इंचभरसुद्दा सरकत नाहीत. ढुंगण वाकडे-तिकडं करून त्याला कशी-बशी जागा करून देतात. सगळी राजकीय भाषणे, उणे-दुणे काढणारी, येत्या निवडणूकीत मोठ्यासाहेबांना लाखांचा लिड देऊ म्हणून गर्जना वगैरे वगैरे! आणी सगळ्यात शेवटी प्रमुख वक्याचं नाव पुकारले जाते. आपण बोलावलेला वक्ता कीती मोठा आहे, हे सांगीतले जाते, विचारवंत वगैरे कौतुकही केले जाते. परंतू कार्यक्रमाला बराच वेळ झाला आहे, मोठे साहेब बोलायचे राहीलेले आहेत, तेव्हा प्रमुख वकत्यांनी आपले भाषण पाच मिनिटात उरकावे, असा आदेशही दिला जातो.

अशी ही लाचारांची फौज! ‘मोठे साहेब, मोठे साहेब’ म्हणून ज्याला मिरवलं जातं, ते मोठेसाहेब जेव्हा जेलमध्ये डांबले जातात, तेव्हा ही सर्व लाचारांची फौज सैरावैरा पळत फिरते, कोणी बीळांमध्ये लपून बसतं. कोणी परदेशात जाऊन तोंड लपवितं, तर काही अतिहुशार लोक पक्षांतर करून सेफझोनमध्ये पळ काढतात. ही फौज म्हणजे अभ्यासाचा एक स्वतंत्र विषयच आहे. नेत्याच्या अवती-भोवती जी लाचार फौज जमलेली असते, तीचे 5 किंवा 6 कप्पे पाडता येतील. पहिला कप्पा जवळच्या नातेवाईकांचा असतो. यात मुलं-मुली, सुना-जावई, मामे-भाचे, काके-पुतणे वगैरे! हे मोठ्यासाहेबांची चाकरी यासाठी करतात की, कुठलं तरी निवडणूकीचं तिकीट मिळेल व साहेबांच्या कृपेने निवडून येऊन वर्णी लागेल! त्यातही चढण-उतरंड असतेच! जवळचे-लांबचे असतात. कोण किती जवळचा-लांबचा त्यावरून आमदारकी द्यायची की नगरसेवकी द्यायची हे ठरते.
एका मोठ्यासाहेबांच्या भाच्याने साहेबांना सुरूवातीपासूनच साथ दिली! संकटातही साथ नाही सोडली, साहेबांच्या मुलांना अंगा-खांद्यावर खेळवलं! परंतू साहेबांच्या ज्या मुलांना अंगाखांद्यावर खेळवलं ती मुलं मोठी झाल्यावर आमदार बनतात, खासदार बनतात. सुना मोठ्या नेत्या बनतात! भाचा मात्र कधीच कुठला पदाधिकारी होत नाही. कारण तो जवळच्या नातेवाइक गटातला नाही. तर असा हा कौटुंबिक सत्ता-स्पर्धेचा पहिला कप्पा! दुसरा कप्पा हा जातींच्या कार्यकर्त्यांचा असतो. गावाकडची किंवा शहरातील लहान-मोठी सत्तापदे, संघटनेची लहान-मोठी पदे मिळविण्यासाठी भाऊ-गर्दी करणारे हे लोक! जातीचं मंगल कार्यालय बांधायचं आहे, म्हणून देणगी मागणारे हे लोक! तिसरा कप्पा हा पक्ष कार्यकर्त्यांचा असतो. म्हणजे प्रत्येक पक्षाला मुसलमान सेल, दलित-हरिजन सेल, ओबीसी सेल, आदिवासी सेल, महिला आघाडी वगैरे वगैरे असतात. या सेलमध्ये काम करणारे हे विविध जातीचे लोक केवळ पक्ष म्हणून या मोठ्यासाहेबांच्या अवती-भोवती असतात. या तिसर्या कप्प्यातील लोक फार अल्पसंतुष्ट असतात. ‘’मै बडे साहब का कार्यकर्ता हुं! ... सेलका उपाध्यक्ष हूं’’ बस्स! इतक्या छोट्याशा पदानेही तो खूश असतो. छोट्या छोटया मान-सन्मानाचा भुकेला असलेला हा मुसलमान, दलित, ओबीसी माणूस नेमकं कोणाचं प्रतिनिधित्व करतो? हजारो वर्षांपासून प्रतिष्ठेपासून वंचित असलेल्या समाज-घटकांचं प्रतिबिंब या माणसांमध्ये आपल्याला दिसत असतं! मात्र या कप्प्यातील एका उपकप्प्यात काही बनेल लोक असतात. ते दलालीचं काम करतात. बदल्या, बढत्या, नियुक्त्या, टेंडर वगैरेंची दलाली आणणे व ती साहेबांपर्यंत पहोचविण्याचं काम ते करतात.

या तीन कप्प्यांव्यतिरिक्त आणखी दोन कप्पे असतात, परंतू हे कप्पे हिडन असतात. पहिला हिडन कप्पा असतो पत्रकार, वकील व साहित्यिकांचा! हा फार क्वचितच उजेडात येतो. हा कप्पा बुद्धीमान लोकांचा असतो. साहेबांच्या भानगडी कोर्टात निपटूण काढणे, साहेबांच्या भानगडी मिडियात येणार नाहीत याची काळजी घेणे, साहेबांचे गुणगाण मिडियात फोकस करणे, साहेबांवर लेख लिहिणे वगैरे कामे ते करतात. साहेबांची एकसष्टी साजरी करण्यासाठी यांची फारच लगबग असते. गौरव समिती, गौरव ग्रंथ, गौरव समारंभ, सन्मान पत्र, जाहीरात, होल्डींग वगैरे सगळी धावपळ करण्याचे काम हा बुद्धिमान वर्गच करतो. आपले मोठे साहेब कसे समाजवादी आहेत, फुले-आंबेडकरवादी आहेत, ते कसे महापुरूषांचे सच्चे अनुयायी आहेत वगैरे पटवून देण्याचे काम ही बुद्धिमान लोकं करतात. त्याबदल्यात त्यांना भरपूर बिदागी मिळते. सरकारी कोट्यातील घरे मिळतात, सरकारी पुरस्कार मिळतात, दर महिन्याला कुठेतरी ‘स्नेहमिलनाच्या’ नावाने ओली पार्टी होते, त्यात यथेच्छ मौजमस्ती करायला मिळते. तर असा हा छुपा-रूस्तम असलेला चौथा कप्पा!
या शिवाय एक छोटासा 3-4 जणांचा कप्पा असा आहे की, ज्याची सविस्तर चर्चा आपण येथे करू शकत नाही. या कप्प्यातील लोक साहेबांच्या अवती-भोवती राहून साहेबांवर लक्ष ठेवण्याचं काम करतात. आज साहेबांना कोण-कोण भेटलेत, काय-काय चर्चा झाली, कीती पेट्या आल्यात व कीती गेल्यात याची सर्व बित्तमबातमी अत्यंत वरच्या जातींच्या साहेबांकडे पहोचविण्याचं काम हे लोक करतात. आपल्या छोट्या जातीच्या मोठ्या साहेबांना हे सर्व माहीत असते. आपल्यावर हेरगिरी करणारे लोक आपल्याच घरात चुलीपर्यंत वावरतात, याची पूर्ण कल्पना असूनही आपले जातीचे नेते चुप राहतात, कारण या हेरांची नियुक्ती अत्यंत वरच्या पाळीवरून झालेली असते. आणी हे फक्त दलित-ओबीसी राजकीय नेत्यांबाबतच घडतं असं नाही तर, जे मोक्याच्या व मार्याच्या जागांवर बसलेले दलित-ओबीसी-आदिवासी अधिकारी आहेत, त्यांच्याबाबतही हे घडतं! या छोट्या कप्प्यात फक्त 3-4 लोक असतात. आपल्या छोट्या जातीच्या मोठ्या साहेबांकडे हे लोक ड्रायव्हर म्हणून किंवा पी.ए. म्हणून नोकरी करीत असतात. त्यांची नियुक्ती ‘’थेट वरून’’ केलेली असते. त्यामुळे आपले साहेब त्यांची बदलीही करू शकत नाहीत. काही गुप्त हेर मित्र वा हितचिंतक रूपात ये-जा करीत असतात व थेट चुलीपर्यंत धडक मारीत असतात.
सहावा कप्पा हा पूर्णपणे हिडन असतो. यात भाई लोक व त्यांचे छिचोरे पंटर असतात. साहेबांच्या विरोधकांविरोधात राडा करणे, विरोधकांना धमक्या देणे, एखाद्याला उचलून आणणे, मतदानाच्या आदल्या रात्री वस्त्यांमध्ये जाउन पैसे वाटणे आदि अनेक जोखमीची कामे या कप्प्यातील भाइलोक करतात. त्यातील काही भाईलोकांना नगरसेवक वगैरे पदे मिळतात. बाकीचे पंटर लोक केवळ ‘जामीन मिळाला’ यावरच खूश असतात. नेत्याच्या आशीर्वादाने हे लोक सगळे अवैध धंदे करतात. महापुरूषांच्या जयंतीच्या नावाखाली खंडणी गोळा करणे, दारू-सट्टे, सुपार्या अशा सर्व धंद्यात पारंगत असणारे हे लोक सतत जेलमध्ये जाण्याच्या भीतीखाली जगतात. कारण एखादा कडक पोलीस अधिकारी आला तर तो नेत्यांचे ऐकतही नाही. पोलीस अधिकारी खूपच जड पडायला लागला की, मग नेता त्या अधिकार्याची बदलीच करतो. अशा बदल्यांसाठी करोडो रुपये पाण्यासारखे वाहात असतात.

या पाचव्या कप्प्यात मुख्यतः दलित-ओबीसी तरूणांचा भरणा असतो. पाच जेलमध्ये गेले की दुसरे दहा त्यांची जागा घेणारे तयार असतात. या कप्प्यातील दलित-ओबीसींची भरती आटु नये म्हणून देशाच्या अत्यंत वरच्या पाळीवरून धोरणे आखली जातात. दलित-ओबीसींचं आरक्षण पूर्णपणे अमलात आणलं तर कोणी दलित-ओबीसी गुंडगिरीकडे कशाला वळेल? यास्तव आरक्षण अमलात आणायचं नाही, हजारोंचा बॅकलॉग ठेवायचा, क्रिमी लेयरची पाचर मारायची, क्षत्रिय जातींना ओबीसीमध्ये घुसखोरी करायला सांगायची, नोकरी नियुक्ती किंवा बढती दिलेली असतांनाही ती न्यायालयाकडून रद्द करून घ्यायची, अशी सर्व षडयंत्रे यशस्वी करून आरक्षण निकामी करण्याचे उद्योग चालू असतात. त्यामुळे दलित-ओबीसी मधील शिकलेल्या तरूणांना नाईलाजास्तव गुन्हेगारीकडे वळावे लागते. त्यातीलच काही भाई नेते बनतात. अशा प्रकारे जे दलित-ओबीसी मधून नेते निर्माण होतात ते वरच्या जातीच्या ‘जाणत्या नेत्यांची’ मेहेरबाणी असते. त्यांची मेहेरबाणी थांबताच हे दलि-ओबीसी नेते जेलमध्ये डांबले जातात.

दलित-ओबीसींमधून सक्षम नेते निर्माण होत नाहीत, हा खरा रोग आहे. तो नष्ट करून सक्षम असे वैचारिक नेतृत्व स्वतः दलित-ओबीसी समाजांनी निर्माण केले पाहिजे. वरच्या जातीच्या ‘जाणत्या नेत्यांनी’ दलित-ओबीसींमध्ये जे नेते निर्माण करून ठेवले आहेत, त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी कोणते कार्यक्रम कसे घडवून आणले पाहिजे, याची चर्चा पुढच्या बहुजननामात कधीतरी करू या!
प्रा. श्रावण देवरे

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget