Breaking News

माण तालुक्यातील आंधळी तलावात खडखडाट; पाणी टंचाईची शक्यता


गोंदवले (प्रतिनिधी) : अपुर्‍या पावसामुळे यंदा आंधळी तलाव पूर्णपणे आटला आहे. पाण्यासाठी इतर पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने दहिवडीसह गोंदवलेकर ग्रामस्थांतून चिंता व्यक्त होत आहे.
आंधळी तलावावर अवलंबून असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतून दहिवडी व गोंदवले बु। ही दोनच गावे सुरवातीपासून कायमस्वरूपी पाणी उचलत आहेत. या योजनेत समाविष्ट असल्याने दोन्ही गावांना टंचाईच्या काळात शासनाकडून टँकरही मिळत नाही. त्यामुळे टंचाईच्या काळात दोन्ही गावांची अवस्था ना घर का, ना घाट का अशी होते.
परिणामी, आर्थिक कुवत नसताना स्थानिक प्रशासनालाच लोकांची तहान भागवण्यासाठी कमालीची धडपड करावी लागते. दुष्काळ निवारणासाठी गेल्या दोन-तीन वर्षांत माण तालुक्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे पावसाचे पाणी ज्या-त्या भागात अडवले गेले आहे. माण नदीच्या उगम झालेल्या कुळकजाई, भांडवली, मलवडी भागात मोठ्या प्रमाणात कामे झाल्याने आंधळी तलावात येणारा पाण्याचा स्रोत जागोजागी अडवण्यात आला आहे. त्यामुळे आता पावसाचे पाणी नदीतून आंधळी तलावात येण्याचे मार्ग जवळपास बंद झाले आहेत. या परिसरात मोठा पाऊस होऊन आंधळीच्या पश्चिमेकडील येणारे सर्व पाणीसाठे भरून वाहिल्याखेरीज तलावात पाणी येणे मुश्किल बनले आहे. यंदा या भागाकडे पावसाने पाठ फिरवल्याने तलावातील पाण्याने गेल्या दोन महिन्यांपूर्वीच तळ गाठला आहे. तरीही गरज म्हणून तलावातील मृत साठ्यातून गाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीसाठी अगदी अल्पकाळ टिकणार असल्याने भविष्यात दहिवडी व गोंदवल्याला मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आगामी काळात जिहे-कटापूर योजना पूर्ण होईपर्यंत आंधळी तलावात पुरेसे पाणी उपलब्ध होण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे या दोन्ही गावांना पाण्यासाठी आता इतर पर्याय शोधावेच लागणार आहेत.