Breaking News

तेलाची आयात व रुपयाच्या घसरणीमुळे आर्थिक संकट : गडकरी


नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या आयातीत झालेली भरमसाठ वाढ आणि सातत्याने होणारी रुपयाची घसरण यामुळे देशात आर्थिक चिंतेचे वातावरण असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. वाढत जाणारी व्यापारी तूट, डॉलरच्या तुलनेत होणारी रुपयाची घसरण यापार्श्‍वभूमीवर आज, गुरुवारी केंद्र सरकारच्या प्रमुख मंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सहभागी होण्यापूर्वी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, जगात सर्वाधिक खनिज तेलाची आयात भारतात होते. देशाच्या एकूण आवश्यकतेपैकी 80 टक्के खनिज तेल आयात केले जाते. तर उर्वरित 20 टक्के देशांतर्गत प्राप्त होते. चालू आर्थिक वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 13 टक्क्यांनी घसरले आहे. 

सातत्याने होणारी रुपयाची घसरण , कच्च्या तेलाची वाढती मागणी आणि त्यामुळे वाढत जाणारा आयात खर्च याचा एकंदर परिणाम देशाच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे. आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल 85 रुपये प्रतिबॅरल पर्यंत जाऊन पोहचले आहे. गेल्या 4 वर्षातील हे सर्वोच्च दर आहेत. दिवसेंदिवस डॉलरच्या तुलनेत कमजोर होणारा रुपया आणि कच्च्या वधारत जाणार्‍या खनिज तेलाच्या किंमती याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवत असून आयएफ आणि एसएलच्या खराब स्थितीमुळे शेअर बाजारातही घसरण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.