Breaking News

साई संस्थानवर सहा आठवड्यात विश्वस्त मंडळ नेमा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश


शिर्डी/ प्रतिनिधी 

येथील श्रीसाईबाबा संस्थानवरील विश्वस्त मंडळ संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज दि. ९ सरन्यायाधीश रंजन गोगाई आणि अन्य दोन न्यायाधिशांसमोर सुनावणी झाली. या सुनावणीत येत्या सहा आठवड्यात साई संस्थानवर विश्वास मंडळाची नव्याने नेमणूक करा, असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश म्हणजे विश्वस्त मंडळ आणि राज्य सरकारला हा एकप्रकारे जोरदार झटकाच असल्याचे बोलले जात आहे. उच्च न्यायालयात राज्य सरकारने नियुक्ती केलेल्या सुरेश हावरे व अन्य विश्वस्त मंडळावरील गुन्ह्यांसबंधी याचिका दाखल करण्यात आली आहे. साई संस्थानच्या संबधित विश्वस्तांविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे सदर याचिकेच्या माध्यमातून न्यायालयाच्या निर्देशनास आणून देण्यात आले होते. त्यातून उच्च न्यायालयाने विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे आणि सचिन भनगे यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन सहा आठवड्यात नवीन विश्वस्त मंडळ नेमा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचे याचिकाकर्ते संजय काळे यांनी सांगितले. 

साईसंस्थानमधील विविध गैरप्रकाराबाबत वेगवेगळ्या याचिका न्यायालयात दाखल आहेत. सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनीदेखील तूप घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याबाबत उच्चस्तरीय चौकशी सुरु आहे. दरम्यान, आज अमावस्येच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाने नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचा आदेश दिला, हा एक योगायोग म्हणता येईल. 

दरम्यान, शिर्डीत सध्या साईंच्या समाधी शताब्दी उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शिर्डीत येणार आहेत. या काळात लाखो साईभक्त शिर्डीत दाखल होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन विश्वस्त मंडळ करण्याच्या आदेशाचे वृत्त प्रसारित होताच साईभक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. साईसंस्थानचे माजी अध्यक्ष स्व. जयंत ससाणे यांनी केलेली कामे आजही साईभक्तांच्या सेवेसाठी उपयोगी पडत आहे.