Breaking News

वृद्धापकाळाची पुंजी मुलांच्या हातात देऊ नका : डॉ.पर्‍हाड यांचे आवाहन


बुलडाणा,(प्रतिनिधी): ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या कष्टाने कमावलेला सर्व पैसा मुलांच्या हातात देवू नये. हाच पैसा वृद्धापकाळात कामाला येणार आहे. तसेच वेळ घालविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक कार्यासह इतर छंद लावून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा सेवानिवृत्त कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर पर्‍हाड यांनी केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ, चैतन्य ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय सेवा संस्था व जिल्हा सेवानिवृत्त कल्याणकारी संस्थेच्या वतीने येथील जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात ज्येष्ठांसाठी कायदे विषयक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

 त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. राज देवकर हे होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी न्यायाधीश आरिफ अन्सारी यांनी आपल्या प्रास्ताविकात मेळाव्याचा उद्देश विषद करून ज्येष्ठांसाठी असलेल्या कायदे विषयक बाबीचा ऊहापोह केला. तर न्यायाधीश चव्हाण यांनी ज्येष्ठांचे पालन पोषण, पाल्यांची जबाबदारी व मृत्युपत्राची आवश्यकता, यावर आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर डॉ. टाले यांनी ज्येष्ठांचे आरोग्य, सुखमय जीवन यासह मैदा, मीठ, साखर, रवा, डालडा या सारख्या पदार्थांचा आरोग्यावर होणारा परिणाम या बाबत विचार व्यक्त करून ध्यान धारणेची माहिती स्पष्ट केली. या प्रसंगी अ‍ॅड. राज देवकर, पितांबरदास चौधरी, डॉ. रामदास भोंडे, चंद्रशेखर सदावर्ते, एम.आर. एवळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अ‍ॅड. दाभाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एन. खर्चे, प्रवीण खर्चे व तोमर यांनी परिश्रम घेतले.