Breaking News

स्वस्थ भारत यात्रा १८ ते २४ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात

मुंबई, दि. ११: राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून संपूर्ण भारतात आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने शाश्वत सामाजिक बदल घडविण्यासाठी आयोजित केलेली 'स्वस्थ भारत यात्रा' यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (एफएफएएसआय), नवी दिल्ली यांनी सुरु केलेली 'ईट राइट इंडिया' चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी 'स्वस्थ भारत यात्रा' चे देशात दिनांक १६ ते २७ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. 'स्वस्थ भारत यात्रा' बाबत माहिती देण्यासाठी एमसीए क्रिकेट क्लब बीकेसी, वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, एफएफएएसआय चे महाराष्ट्र विभागीय संचालक मुथ्थूमारन, दिल्ली येथील सहायक संचालक अखिलेश गुप्ता, एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जगमीत मदान, एएफटीएसआय संस्थेचे अध्यक्ष प्रबोध हलदे, अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त सी. बी. पवार आदींसह अन्न व औषध प्रशासनचे राज्यभरातील सहआयुक्त, सहायक आयुक्त यावेळी उपस्थित होते.