खोटा कळवळा दाखवण्यापेक्षा जिल्हा बँकेची थकीत रक्कम भरा भाजपच्या श्‍वेताताई महाले यांचे आ. राहुल बोंद्रेंना आव्हान


चिखली,(प्रतिनिधी): शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेती व शेतकर्‍यांच्या उन्नत्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. परंतु, आपले चमकोगिरीचे राजकारण चालवण्यासाठी आ.राहुल बोंद्रे राज्य सरकारची बदनामी करीत आहेत. असा आरोप करीत आ. बोंद्रे यांना शेतकर्‍यांचा एवढाच कळवळा असेल तर त्यांनी राज्य सरकारवर भंपक आरोप करण्यापूर्वी स्वतः च्या संस्थांकडे थकीत असलेले जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे 42 कोटी रुपये आधी भरावे असे आव्हान भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले यांनी आ. राहुल बोंद्रे यांना दिले.

 चिखली तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत करण्यासाठी आपण मंत्रालय स्तरापर्यंत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही श्रीमती महाले यांनी दिलेल्या पत्रकातून दिली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील दुष्काळी तालुक्यांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. राहुल बोंद्रे यांनी सरकारवर टीका केली. चिखली व बुलडाण्यासह पाच तालुक्यांचा या यादीत समावेश करावा अन्यथा आपण आंदोलन करु असा इशारा आ. बोंद्रे यांनी काल राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रत्यक्ष भेट घेवून दिला होता. या पृष्टभुमिकवर श्रीमती महाले यांनी यावर एक पत्रक प्रसिद्धीला देऊन राज्य सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांच्या भल्यासाठी काहीही करण्याची पोकळ घोषणा करणार्‍या आ. राहुल बोंद्रे यांनी फक्त जिल्हा सहकारी बँकेचे थकीत 42 कोटी रुपयांचे कर्ज भरावे असे आव्हान श्रीमती महाले यांनी दिले. अनुराधा शुगर मिल आणि मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणी यांच्याकडे अनेक वर्षांपासून शेतकर्‍यांची बँक असलेल्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे 42 कोटी रुपये कर्ज थकीत आहे. त्यामुळे ही बँक आणि पर्यायाने जिल्ह्यातील शेतकरी बांधव अडचणीत सापडले आहेत याकड महाले यांनी लक्ष वेधून आपले चमकोगिरीचे राजकारण चालवण्यासाठी केवळ घोषणाबाजी करणार्‍या आमदारांनी नाटक न करता शेतकर्‍यांच्या भल्यासाठी केवळ 42 कोटी रुपये जमा करून दाखवावे असे आव्हान श्‍वेताताई महाले यांनी आ. राहुल बोंद्रे यांना दिले. हा तर शेतकर्‍यांच्या हक्काला विरोधः आ. राहुल बोंद्रे आपण एक लोकप्रतिनिधी आहोत, लोकांनी मला निवडून दिले आहे, त्यांच्या न्याय हक्काची मागणी करणे वेळप्रसंगी त्यांच्यासाठी आंदोलन करणे हे माझे कर्तव्य आहे. शासनाने चिखली तालुक्याला दुष्काळी तालुक्यातून वगळल्याने शेतकर्‍यांच्या हितासाठी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी मागणी आपण केली. या मागणीला जर कोणी विरोध करित असेल तर, तो तमाम शेतकर्‍यांचा अपमान आहे, अशा शब्दात आमदार राहूल बोंद्रे यांनी श्‍वेताताई महाले यांना उत्तर दिले. शनिवारी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत जिल्हयात आले असता आ. राहुल बोंद्रे यांनी एका निवेदनाव्दारे चिखली तालुक्याचा दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश करा अशी मागणी केली. यावर सभापती श्‍वेताताई महाले यांनी पत्रक काढून आ. बोंद्रे यांच्या मागणीची खिल्ली उडवत बोंद्रे यांचा शेतकर्‍याप्रती खोटा कळवळा असल्याचे त्यांनी म्हटले. यावर आ. बोंद्रे यांनी जशास तसे उत्तर दिले. दै.लोकमंथनशी बोलताना आ. राहुल बोंद्रे म्हणाले की, चिखली तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात तर, आतापर्यंत का केला नाही? आम्हाला सरकारकडे मागणी करण्याची वेळ का येवू देता? असा सवाल करून आ. बोंद्रे म्हणाले की, राहीला प्रश्‍न जिल्हा बँकेच्या कर्जाचा, या विषयावर ज्यांच्यामध्ये नैतिकता आहे त्यांनीच बोलावं. ज्यांच्या पक्षातील लोकांनी कर्ज भरले नाही त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे काय? आधी आपल्या नेत्यांना जिल्हा बँकेचे कर्ज भरण्याचा सल्ला दया, आ. चैनसुख संचेती, खा. प्रतापराव जाधव आणि ज्यांच्या पाठिंब्यावर आपण जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत आहात त्या पक्षाचाही दिग्गज नेत्यांनी जिल्हा बँकेचे कर्ज भरले नाही. जरा त्यांनाही पैसे भरण्याचा सल्ला दया नंतरच आमच्याकडे बोट दाखवा असाही टोला आ. राहुल बोंद्रे यांनी लगावला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget