Breaking News

पशूपालक शेतकरी चारा छावनीच्या प्रतिक्षेत

आष्टी (प्रतिनिधी) वर्षानुवर्षे आष्टी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत चालले असून, दुष्काळजन्य परिस्थिती वाढतच आहे. पाण्याच्या भीषण टंचाईसह जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर झालाय... त्यामुळे, तालुक्यातील पशुधन धोक्यात आले आहे. काळजावर दगड ठेवून जिवापाड जपलेल्या गाई- गुरे- म्हशींची विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने आष्टी तालुक्यातील अनेक धरणे कोरडेठाक पडले आहेत. 

पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चा-याची चिंता पशूपालक शेतक-यांना घेरावत आहे. त्यामुळे, भर पावसाळ्यात ही अवस्था तर पुढे काय असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना भेडसावत आहे. अल्पशा पावसानंतर शेतकर्‍यांनी पेरणी केली. परंतु काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी थेंबच पडला नाही. त्यामुळे, अनेक ठिकाणची पिके पाण्याअभावी वाया गेली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील अनेक धरणाच्या परीसरात मोठया प्रमाणात पाण्याच्या विद्युतपंपाव्दारे पाणी उपसा होत असून प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर धरणातील हा ही पाण्याचा साठा संपून तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. पाण्याची भीषण टंचाई आणि त्यातच चार्‍याचे गगणाला भिडलेले भाव, यामुळे आष्टी तालुक्यातील पशुधन धोक्यात आले आहे. काळजावर दगड ठेवून जिवापाड जपलेल्या गाई- गुरे- म्हशींची विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे.