Breaking News

लोकसहभागातून वनक्षेत्राचे संरक्षणासह आणि संवर्धनाची जबाबदारी आपलीच : सौ. आखाडे


पाचगणी (प्रतिनिधी) : लोकसहभागातून वनक्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आपले गाव, आपले जंगल मग जबाबदारीही आपलीच. या योजनेत वनक्षेत्र असलेल्या गावात लोकांच्या सहभागातून संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात येते. ग्रामीण भागातील लोकांच्या सहभागातून वनांचे संरक्षण होणे हा या समितीचा उद्देश असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सौ. नीता आखाडे यांनी केले. 
बोंडारवाडी (धनगरवाडी, ता. महाबळेश्वर) येथे आयोजित संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापना व वृक्षारोपण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल रणजितसिंह गायकवाड, गुरेघरचे वनपाल सुनिल लांडगे, वनपाल एस. के. नाईक, संतोष आखाडे, ग्रामसेवक पोमने उपस्थित होते.
वन्यजीव सप्ताहनिमित्त वनक्षेत्रपाल गायकवाड यांनी वन्यजीवांविषयी माहिती दिली. वन्य जीवांचे पर्यावरणातील अनन्यसाधारण महत्व लक्षात घेवून सर्वांनी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारायला हवी. वनसंपदा असेल तरच वन्यजीव असतील त्यामुळे पहिली वनसंपदा वृध्दींगत करा, असे सांगून त्यांनी वनव्यवस्थापन समितीच्या कार्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते यावेळी वनसमितीच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी वनविभागाच्या जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले. त्यात आवळा, जांभूळ, गेळा आदी वृक्षांची लागवड केली आहे. यावेळी अध्यक्ष पदी तुकाराम शिंदे, उपाध्यक्ष पदी अभय डोईफोडे, सचिवपदी आनंदा आखाडे, सहसचिव पदी सौ. वैशाली शिंदे तर सदस्य पदी तुकाराम ढेबे, लक्ष्मण डोईफोडे, दत्तात्रय डोईफोडे, धोंडिबा डावले, शंकर ढेबे, सौ. प्रीती डोईफोडे, सौ. सुनीता होगाडे यांची एकमताने निवड झाली. नूतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन होत आहे.