Breaking News

साथींच्या आजारांवर उपाययोजना राबवू : आ. कर्डिले


राहुरी / प्रतिनिधी

शहरात विविध साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेक जण शहरासह नगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्याचे आ. शिवाजी कर्डिले यांनी नुकतीच राहुरी येथील रुग्णांची भेट घेतली. यावर मार्ग काढण्यासाठी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून तात्काळ उपाययोजना राबवू, अशी ग्वाही आ. कर्डिले यांनी यावेळी बोलतांना दिली.
गेल्या अनेक महिन्यांपासून राहुरी नगरपरिषद हद्दीतील बिरोबा नगर, शेटे इस्टेट, सातपीर बाबा दर्गा परिसर तसेच येवले आखाडा परिसरात मलेरिया, टायफाईड, गोचिड ताप तसेच डेंग्यूसदृष्य साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. प्रत्येक घरातील दोन तीन जण या आजारांनी ग्रासले आहेत. यासाठी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सुमारे १० ते १५ हजार रुपये येत आहे. त्यामुळे या खर्चाची तोंडमिळवणी करतांना सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. रोजंदारीने मोल मजुरी करून रोजचा खर्च भागवायचा, की दवाखान्याची बिले भरायची, अशा व्दिधा मानसिकतेत नागरिक अडकले आहेत. येवले आखाडा परिसरातील सुमारे ३० ते ४० नागरिक विविध साथीच्या आजाराने त्रस्त झाले असून येथील रुग्णालयात ते उपचार घेत आहेत.

या सर्व रुग्णांची आ. कर्डिले यांनी शहरातील काही रुग्णालयांत जाऊन विचारपूस केली. यावेळी नगरसेवक शहाजी ठाकूर, अमोल भनगडे, दिपक लांडगे, अजित डावखर, शरद उदावंत, उमेश शेळके, संदिप नेहे, दिपक वाबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटीत नागरिकांनी आ. कर्डिलेंसमोर समस्यांचा पाढाच वाचला.यामुळे नगरपरिषदेच्या निष्क्रिय कारभाराची लक्तरेच चव्हाट्यावर आली.