श्रीरामपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा; हिंदू एकता आंदोलन पक्षाची मागणी


श्रीरामपूर (प्रतिनिधी) ः अहमदनगर जिल्ह्यात 13 तालुके असून या वर्षी अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे श्रीरामपूर हा तालुका दुष्काळग्रस्तांमधून वगळण्यात आला असून दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आलेला नाही. श्रीरामपूर तालुक्यामध्ये उद्योगधंदे नाहीत. एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने नाहीत, त्यामुळे लोकांच्या हाताला कामे नाहीत. युवकांचं शिक्षण जादा प्रमाणात झालेलं असूनही त्यांना नोकर्‍या नाहीत. तसेच उसाच्या शाश्‍वत उत्पन्न असलेल्या एकमेव पिकाला हुमणी किडीने बाधित केल्याने शेतकरीसुद्धा हतबल झाले आहेत. या किडीने जवळपास 50 टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला असून 80 टक्के पिके धोक्यात आली आहेत. 

शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव नाही. कांद्याचे भाव अचानक गडगडले. शेतकर्‍यांची परिस्थिती एवढी गंभीर असताना बाधित पिकाचे नुकसानीचे पंचनामे न करता शासन शेतकरीविरोधी भूजल कायदा आणू पहात आहे. जून 2018 ते ऑक्टोबर 2018 मधील पावसाच्या आकडेवारीची नोंद झाली आहे, ती पाहता शासनाने दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्‍यांना सवलती देण्यात याव्यात. तसेच गोरगरीब होतकरूंना केसरी कार्ड असल्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही. तरी त्यांना धान्यासह दिवाळीसाठी पामतेल व साखर मिळावी. महावितरणचे भारनियमन असल्यामुळे विहिरीत पाणी असूनही मोटारी चालू नाहीत. त्यामुळे पिके जळून चालली आहेत. शासनाने दुष्काळ जाहीर केला तर श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांना भरपाई मिळून तो पैसा व्यापारी वर्गात फिरेल अन् मार्केट तेजीत राहील. आतापर्यंत शासन कागदोपत्रीच योजना राबवीत आहे. परंतु, हातात त्या योजनेचा काहीच फायदा नाही. हे सरकार भुलभुलैय्या असून जर शासनाने दुष्काळ जाहीर केला नाही तर आम्ही हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने आंदोलन छेडणार आहोत. वेळप्रसंगी आमरण उपोषण करू, असे हिंदू एकता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे व शहराध्यक्ष मंगेश छतवाणी यांनी दिली. या पत्रकावर प्रदेश संघटक विजय जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष चिलिया तुवर, जिल्हाप्रमुख मनोहर बागुल, जिल्हा संघटक वसंत गायकवाड, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष शिवाजी फोफसे, राहाता तालुकाध्यक्ष प्रसाद क्षिरसागर, जिल्हा संघटक दत्तात्रय मंडलिक, जिल्हा उपाध्यक्ष रामा सदाफळ, शेतकरी संघटनेचे जे.एम.वाकचौरे, नेवासा तालुकाध्यक्ष अविनाश कनगरे, कोपरगाव शहराध्यक्ष अशोक भगत, राहुरी तालुकाध्यक्ष सोपानराव पागिरे, भिकन शेख, ए.एस. जहागिरदार, गुरू भुसाळ, सोमनाथ जगताप आदींच्या सह्या आहेत

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget