Breaking News

सातार्‍यातील ग्रेड सेपरेशनच्या खुदाईत आढळला ऐतिहासिक भुयारी मार्ग


गुरुदास अढागळे/सातारा : 
सातार्‍याचे हार्ट ऑफ सिटी ठरलेला पोवईनाका आपली कात टाकत असतानाच सध्या या परिसराचा चेहरा मोहर्‍या बदलणार्‍या गे्रड सेपरेटरचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या गे्रड सेपरेटरमुळे पोवईनाक्याचा जुना चेहरा कायमचा पुसला जाणार आहे. सातार्‍याला असणारा ऐतिहासिक वारसा पाहता पोवईनाका येथे सुरु असलेल्या या खोदकामादरम्यान उजाळा मिळाला असून मरिआई कॉम्प्लेक्स ते आयडीबीआय बँक (जुनी युनायटेड वेस्टर्न बँक) या परिसरात एक प्राचीन भुयार आढळले असून या भुयाराची दोन्ही बाजूची प्रवेशद्वारे मोकळी झाल्याने हा काळाच्या पडद्याआड जाणारा ठेवा उघड झाला आहे.
सातार्‍याचे पूर्वेचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या पोवईनाक्याला या ठिकाणी असलेल्या पाणपोईवरुन पोवईनाका हे नाव मिळाले. सध्या या परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यामुळे या परिसराला शिवाजी सर्कल असेही म्हटले जाते. आठ रस्ते एकाच ठिकाणी एकत्र येणारे जुन्या काळातील हे केवळ जिल्ह्यातीलच नव्हेतर महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण असावे याच परिसरात सध्या ग्रेड सेपरेटरचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या कामामुळे सातारकरांची होत असलेली गैरसोय हा वादाचा मुद्दा असला तरी भविष्यकाळात होणारी सोय म्हणून सातारकर निमूटपणे तो सहनही करत आहेत. मुख्य ठिकाणाचे पूर्णत्वाकडे निघालेले असताना या ग्रेडसेपरेटरचाच एक भाग असलेला शहरातून येणार्‍या रस्त्यावर खुदाईचे काम मोठ्या प्रमाणावर सध्या सुरु आहे हे काम सुरु असताना रस्त्यापासून खाली सुमारे अडीच ते तीन फुटावर मरिआई कॉम्प्लेक्स ते आयडीबीआय बँक (जुनी युनायटेड वेस्टर्न बँक) या दरम्यान दक्षिण उत्तर असे संपूर्ण दगडी बांधकाम असलेले भुयार आढळले आहे. सुमारे अडीच ते तीन फूट रुंद व तेवढीच उंची असलेले हे भुयार संपूर्ण दगडी आहे. या भुयाराचे नेमके प्रयोजन काय असावे याबाबत अनेक शक्यता व्यक्त होत आहे. सध्या ज्या ठिकाणी आयडीबीआय बँक आहे. त्याठिकाणी साधारणपणे 1971 पूर्वी जी. पी. सातारवाला या पारशी गृहस्थाचा दिलबहार नावाचा मोठा बंगला होता. तर त्या बंगल्याच्या उजव्या बाजूला प्राचीन मरिआई महालक्ष्मीचे जुने पत्र्याचे मंदिर होते. याव्यतिरिक्त पांथस्थासाठी असलेली पाणपोई आणि त्यानजीक छत्रपती शाहू महाराजांचा रिसालदार दौलतखान यांच्या वंशजांची कबरी एवढेच बांधकाम याठिकाणी होते. खुदाईमुळे उजेडात आलेला भुयारी मार्ग हा कदाचित पारशी सातारवाला यांच्या बंगल्यातून बाहेर पडण्याचा मार्ग असण्याची शक्यता असून दुसरी शक्यता मरिआई कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या महालक्ष्मी मंदिरातून हे भुयार निघाले असल्याची आहे. या भुयाचे बांधकाम पाहता केवळ पाणी जाण्यासाठी इतके भक्कम बांधकाम जमिनीखाली बांधण्याची शक्यता फारच कमी आहे. महालक्ष्मी मंदिर हे सातार्‍याची तत्कालिन वेस असलेल्या मारुती मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे. कदाचित हे भुयार याच मंदिरातून बाहेर पडण्याचा मार्गही असू शकतो. या परिसरात दुसरे कोणतेही ऐतिहासिक बांधकाम नसल्याने या शक्यतेला जास्त दुजोरा मिळत आहे. सध्याच्या आयडीबीआय बँकेच्या इमारतीच्या जागी असलेला पारशी सातारवाला यांचा बंगला आणि महालक्ष्मी मंदिर ही दोनच जुनी बांधकामे या परिसरात होती. आणि भुयाराचा मार्गही या दोन्हींना जोडणारा दुवा असू शकतो. पारशी बंगल्याच्या आधी त्या परिसरात नेमके कोणते बांधकाम होते, याचा पुरावा मिळत नाही. 
भुयाराचे बांधकाम संपूर्ण चुन्यामध्ये असून त्यासाठी वापरण्यात आलेला दगडही सध्या ग्रेड सेपरेटरच्या खुदाई निघत असलेल्या खडकांसारखाच आहे. अत्यंत भक्कम बांधकाम असलेल्या या भुयाराचा काही भाग याकामामुळे कायमचाच काळाच्या पडद्याआड जाणार आहे. सातार्‍याला असलेल्या ऐतिहासिक पार्श्‍वभूमीने शहर परिसरात अशी भुयारे असणे मोठे नवल नाही मात्र, त्याकाळी शहराच्या बाहेर असलेल्या पोवईनाक्यावर असे भुयार आढळणे म्हणजेच या परिसरात त्याकाळात मोठी इमारत अगर वाडा असण्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे.