Breaking News

डॉ.आंबेडकरांच्या पदस्पर्श स्थळाच्या सौंदर्यीकरणासाठी एक कोटी प्राप्त


संग्रामपूर,(प्रतिनिधी): तालुक्यातील पातुर्डा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या विहीर व परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 99 लाख 92 हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. काम सुरू करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी 14 ऑक्टोबरला पाहणी केली आहे. 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर 29 मे 1929 मध्ये पातुर्डा येथे आले होते. आठवडी बाजारातील विहिरीला भेट देऊन बहुजन समाज बांधवांसाठी विहीर त्यांनी खुली केली होती. तसेच मुलांच्या मराठी शाळेत ते दोन दिवस मुक्कामाला होते. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळाच्या सौंदर्यीकरण व मुक्काम केलेल्या शाळा खोलीचे जतन म्हणून खोलीचे नूतनीकरण, ऐतिहासिक विहीर परिसरात खोली बांधकाम, प्रसाधनगृह व परिसरातील बसस्थानक आधुनिकीकरण, परिसरात पेव्हर ब्लॉक, शाळा खोली लगत आधुनिक वाचनालयाकरिता सामाजिक न्याय विभागाकडून विशेष समाजकल्याण विभागाला 99 लक्ष 92 हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. दरम्यान काल या ऐतिहासिक स्थळाच्या निरीक्षणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता जितेंद्र काळे व शाखा अभियंता बी.एस. लबडे यांनी पाहणी केली. पातुर्डा येथील ऐतिहासिकल स्थळाच्या सौंदर्यीकरणाची कामे लवकरच म्हणजे महिनाभरानंतर सुरू होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य लोकेश राठी, अविनाश धर्माळ, श्रीकृष्ण मोहनकार, संजय दाभाडे, रमेश वानखडे, प्रकाश अरबट, रमेश दाभाडे, इरफानोद्दीन काझी, गजानन दाभाडे, गणेश धर्माळ व ग्रामस्थ उपस्थित होते.