Breaking News

विधानपरिषद विशेषाधिकार समितीकडून महाबळेश्वर पालिकेच्या उपक्रमांचे कौतुक


सातारा (प्रतिनिधी) महाबळेश्वर पालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम स्तुत्य असून स्वच्छता मोहिमेसोबतच प्लास्टिक बंदीचा घेतलेल्या निर्णय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन विधान परिषद विशेषाधिकार समितीच्या अध्यक्ष डॉ. आ. नीलम गोर्‍हे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर समितीचे सदस्य आ. रामभाऊ वडकुते, नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, प्रांताधिकारी संगीता चौगुले, तहसीलदार मिनल कळसकर, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, अवर सचिव उमेश शिंदे उपस्थित होते.
विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीच्या अध्यक्ष डॉ. आ. नीलम गोर्‍हे यांनी महाबळेश्वर नगरपालिकेस शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. पालिकेच्या कै. भाऊसाहेब माळवदे सभागृहातील छ. शिवाजी महाराजांच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. पालिकेच्या नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन डॉ. आ. नीलम गोर्‍हे यांचे स्वागत केले. याप्रसंगी विधानपरिषद विशेषाधिकार समिती सदस्य आ. रामभाऊ वडकुते उपस्थित होते.

महाबळेश्वर सारख्या जगप्रसिध्द प्रेक्षणीय स्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जाबाबत आपण स्वतः पुढाकार घेत मुख्यमंत्र्यांच्या सोबत पालिका पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करू असे सांगून गोर्‍हे म्हणाल्या, पालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत नागरिकांसोबत महिला बचतगटांचा सहभाग, प्लास्टिक बंदीसारख्या उपक्रमांचे कौतुक केले. महाबळेश्वर-पांचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांची इत्यंभूत माहिती असलेले संकेतस्थळ विकसित करावीत, अशी सूचना मांडली. अद्वितीय निसर्ग सौंदर्य लाभलेल्या महाबळेश्वर या पर्यटनस्थळांची दूत म्हणून मला काम करायला नक्कीच आवडेल असे नमूद करून ‘इंक्रिडिबल महाबळेश्वर’ सारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची शासन आपल्या पाठीशी आपण स्वतः याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करू नमूद केले. प्रथम नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे यांनी पालिकेचा स्वप्नवत प्रकल्प असलेल्या वेण्णालेक सुशोभीकरण, तसेच पालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. शासनाच्या आधी राज्यात महाबळेश्वर पालिकेने प्रथम संपूर्ण प्लास्टिक बंदी केल्याचे नमूद केले. समितीचे सदस्य आ. रामराव वडकुते यांनी मार्गदर्शन करताना महाबळेश्वर पालिकेच्या प्लास्टिक बंदीचे मॉडेल राज्याने घेतले असे सांगून महाबळेश्वर पांचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे महाराष्ट्रात विकासाचे रोल मॉडेल ठरतील, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी केले तर कुमार शिंदे यांनी आभार मानले.