Breaking News

मुळा धरणाचे तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी; शेवगाव येथील शेतकर्‍यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन


शहरटाकळी/प्रतिनिधी 
मुळा धरणातून रब्बी हंगामासाठी तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी शेवगाव तालुक्यातील टेलच्या भागातील शेतकर्‍यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे यांच्याकडे केली आहे. निवेदनाच्या प्रती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पाठवले असल्याची माहिती रामेश्‍वर पाणीवापर संस्थेचे सदस्य बापूसाहेब लोढे यांनी सांगितले. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मुळा धरणाच्या पाण्यावर तसेच पावसावर आमची शेती 
फुलते, फळते आणि पिकते. चालू वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने टेलच्या भागातील शेतकर्‍यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे परिसराचे व शेती पिकाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. शेतकर्‍यांचेे अर्थकारण पुरते कोलमडले आहे. अशातच मुळा धरणाच्या टेलच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर हाततोंडाशी आलेले ऊस, कपाशी, कांदा हि पिके उभी आहेत. या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. येत्या आठवडाभरात आवर्तन सुटले तर पिकांना संजीवनी मिळणार आहे. मुळा धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याचे काटकसरीने नियोजन केल्यास वर्षभराचे पिण्याचे पाणी राखीव ठेऊन मुळा धरणातून किमान शेतीसाठी व पिण्यासाठी दोन रोटेशन सहज देता येणार आहेत. रब्बी हंगामाचा विचार करता धरणातून पाणी सोडणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे जनावरांचा चारा व पिण्याचे पाणी हे प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. तरी प्रशासनाने अधिकार्‍यांची मिटिंग बोलावून दि. 1 नोव्हेंबर पासून रब्बी हंगामासाठी मुळा उजवा कालव्यातून टेलच्या भागातील शेतकर्‍यासाठी त्वरित आवर्तन सोडावे व टेलच्या भागातील शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थितीत दिलासा द्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर मजलेशहर येथील रामेश्‍वर पाणीवापर संस्थेचे बापूसाहेब लोढे, माजी सरपंच विक्रम लोढे, बाळासाहेब उभेदळ, हनुमान मगर, माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लोढे, अप्पासाहेब फटांगरे, प्रगतशील शेतकरी तुकाराम लोढे, रामनाथ पिसुटे, आरगडे अंबादास, ज्ञानदेव लोढे आदींसह शेकडो शेतकर्‍याच्या सह्या आहेत.