Breaking News

पुर्ण दाबाने वीज मिळण्यासाठी रास्तारोको आंदोलन; प्रहार जनशक्ती पक्ष शेतकर्‍यांच्या मागणीसाठी रस्त्यावर


भाविनिमगाव : शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव जोरापुर खामगाव या 3 गावातील शेती वरील वीज गेल्या दीड महिन्यापासून पूर्ण दाबाने मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे पिके धोक्यात असून पाणी असूनही पिकाला विजेअभावी देता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून वेळोवेळी वीज वितरण अधिकारी, कर्मचारी व कार्यालयात कळवूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वीज वितरण व संबंधित विभागाला निवेदन देऊन रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

निवेदनात म्हटले आहे की गेल्या दीड महिन्यापासून पूर्ण दाबाने विज मिळत नसल्याने दररोज केवळ दिवसभरात एक तास विज मिळत असून तीही दहा वीस मिनिटाच्या तीन- चार टप्प्यांतून उपलब्ध होत असल्याने शेती पाण्याला तिचा काहीही उपयोग होत नसल्याने व कर्मचार्‍यांना वेळोवेळी कल्पना देऊनही वीज वितरण कर्मचारी विजेचा प्रश्‍न सोडवण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज शेतकर्‍यांनी तालुका विज वितरण कार्यालय,पोलीस स्टेशन व संबंधितांना निवेदन दिले असून येत्या 25 तारखेला गुरुवार रोजी शेवगाव शहरातील क्रांती चौकात पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनात वरील भागातील शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र सबस्टेशन, स्वतंत्र मेन लाईन चीही मागणी करण्यात आली आहे. वर प्रहार जनशक्ती पक्षाचे शेवगाव तालुकाध्यक्ष संदीपजी बामदळे, सरपंच महादेव पवार, इरफान काझी, सतिष पवार, विनोद पवार, जनार्दन बामदळे, डिगु वाबळे, कानिफनाथ धुमाळ, दत्तात्रय म्हस्के, बबन पवार आदी सह शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

शेतकर्‍यांच्या हक्कासाठी आंदोलन करू 
दुष्काळग्रस्त परीस्थिती असतात उपलब्ध पाण्यावर शेतकरी उभे पीक जगण्यासाठी तळमळ करत असताना महावितरण कर्मचारी विजेचा फॉल्ट काढून शेतकर्‍यांना आधीच अपुरी असलेली वीज व्यवस्थित देत नसुन पिके करपत आहेत. तर कर्मचारी दुरूस्ती कडे चालढकल करत आहे. त्यासाठी आंदोलन करण्याची हौस नाही मात्र शेतकर्‍यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.
संदिप बामदळे - तालुकाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष.