Breaking News

प्रवीण तोगडिया यांची पक्ष स्थापनेची घोषणा


नवी दिल्ली : राम मंदिर मुद्द्यावरून केंद्र सरकारला बॅकफुटवर आणणार्‍या आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पक्ष स्थापनेची घोषणा केली. ही घोषणा त्यांनी अयोध्येत केली. ‘अबकी बार केवळ हिंदूंचे सरकार असेल, असेही तोगडिया यावेळी म्हणाले. तोगडिया म्हणाले, केंद्रातील सरकार रामाच्या नावावरच सत्तेत आले आहे. मात्र, मोदीजी आता मशिदीत डोके टेकवायला लागले आहेत. 

निवडणूक जवळ आली, तर ते म्हणतायेत न्यायालयाच्या माध्यमाने मंदिर निर्माण होईल. संघ आणि भाजपने सातत्याने मंदिराचे स्वप्न दाखवून मते मिळविली. मात्र, सरकार आल्यानंतर ते सर्व विसरले. आम्ही पूर्णपणे हिंदूंसोबत आहोत. आता, अबकी बार हिंदूंचे सरकार येईल, धोकेबाजांचे सरकार नाही. आम्ही जे आश्‍वासन देऊ ते पूर्ण होईल. 2019 मध्ये हिंदूंचे सरकार निवडण्याचा नवा पर्याय लोकांकडे असेल, असे म्हणत 1 बूथवर 25 यूथ असतील, असेही तोगडिया म्हणाले. केंद्रात 2014 मध्ये भाजप सरकार आल्यानंतर राम मंदिराची चर्चा पुन्हा सुरू झाली. तेव्हा म्हणण्यात आले होते, की राज्यसभेत बहुमत होऊ द्या. 24 जूनला आंतराष्ट्रीय हिन्दू परिषदेची स्थापना करून आम्ही मोदींना विजया दशमी 2018 पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, या अहंकारी सरकारने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. आता आम्ही भाजपला पर्याय म्हणून जनतेला असा पक्ष देऊ, जो केवळ हिंदूंचा असेल, हिंदूंच्या सोबत असेल आणि 2019 च्या निवडणुकीत ज्या पक्षाला लोक मतदान करतील, असेही तोगडिया म्हणाले.