Breaking News

वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार, एक गंभीर जखमी


बिबी,(प्रतिनिधी): बिबी येथील दोन नवयुवक ट्रॅक्टरची ट्राली खरेदी करण्यासाठी मोटारसायकलने उंद्री येथे जात असताना मलकापूर पांगरा ते साखरखेर्डा रोडवर आंबेवाडी फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीस सिंदखेड राजा पंचायत समितीच्या हातपंप दुरुस्ती करणार्‍या वाहनाने धडक दिली. त्यात मोटारसायकल चालक जागीच ठार झाला तर त्याचा साथीदार गंभीर रित्या जखमी झाला आहे.

 बिबी येथील दीपक पंजाब गावडे व पप्पू विश्‍वनाथ धाईत हे तरुण मोटारसायकलने उंद्री येथे जात होते. त्यावेळी मलकापूर पांग्रा - साखरखेर्डा मार्गावर आंबेवाडी फाट्यानजीक पोहोचल्यावर समोरून येणार्‍या सिंदखेड राजा पंचायत समितीच्या हातपंप दुरुस्ती करणार्‍या वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला जबर धडक दिली त्यात दीपक गावडे हा तरुण जागीच ठार झाला आहे तर पप्पू विश्‍वनाथ धाईत हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मेहकर येथे प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. मृतक तरुणाने दसर्‍याच्या दिवशी व्यवसाय करण्यासाठी ट्रॅक्टर खरेदी केला होता व तो उंद्री येथे ट्राली बघण्यासाठी व खरेदी करण्यासाठी चालला होता. त्याच्या अपघाती निधनाने त्याच्या कुटुंबावर व बिबी वासियांवर शोककळा पसरली आहे. दीपक हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.