Breaking News

शबरीमला महिला प्रवेश : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका


नवी दिल्ली - केरळच्या सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान करणारी पुनरावलोकन याचिका ’राष्ट्रीय अयप्पा डेव्होटी असोसिएशन’ने न्यायालयात दाखल केली आहे. याच पार्श्‍वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावली होती. मात्र, सबरीमाला मंदिरातील पुजारी आणि संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला.

दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात भक्तगण रस्त्यावर उतरले आहेत. ‘सेव्हसबरीमाला’ आणि ‘रेडीटूवेट’ हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. 28 सप्टेंबर रोजी 10 ते 50 वयोगटातील महिला केरळच्या प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात प्रवेश करू शकतात, हा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयातील 5 सदस्यांच्या खंडपीठाने दिला होता. 

केरळ सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनरावलोकन याचिका दाखल करणार नाही, असे मुख्यमंत्री विजयन यांनी 3 ऑक्टोबरलाच स्पष्ट केले होते. तसेच त्रावणकोर देवस्वोम बोर्डानेही (टीडीबी) न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या सबरीमाला मंदिराला दरवर्षी हजारो भक्तगण भेट देत असतात.
मंदिराच्या प्राचीन परंपरा टिकाव्यात असं आम्हाला वाटत असल्याचे पंडलम या शाही कुटुंबाचे प्रवक्ते आर. आर. वर्मा यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची कशी अमलबजावणी करावी यावर चर्चा करण्यात आपल्याला रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंदिराची ऐतिहासिक परंपरा जतन करावी अशी अय्यप्पाच्या भक्तांची मागणी असून त्यासाठी निदर्शनेही करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे सनातन धर्माच्या परंपरांचं पालन करावं यासाठी करण्यात आलेल्या या निदर्शनांमध्ये महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होता.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली नसल्याने सीपीआय (मार्क्सवादी) च्या विरोधात काँग्रेस व भाजपा या दोघांनी टिकेची झोड उठवली आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय खंडपीठानं 4 -1 अशा फरकानं शबरीमला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा असा निकाल दिला होता. अनेक शतकांच्या या परंपरेचा अत्यावश्यक धार्मिक परंपरांमध्ये समावेश होत नसल्याचा निष्कर्ष सुप्रीम कोर्टानं काढला होता.