Breaking News

अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब


बीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडिता ही सहा महिन्यांची गर्भवती आहे. बीड पोलिसांनी तिचा जबाब घेतला आहे.या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.बीड तालुक्यातील एक कुटूंब कामासाठी टेंभूर्णी (जि.सोलापूर) येथे गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची १४ वर्षाची मुलगीही होती. आई-वडिल दिवसभर कामाला ेगेल्यानंतर घरात कोणीच राहत नसे. हीच संधी साधून तेथील गणेश खुळे, विलास खुळे या दोन विवाहित पुरूषांसह अनिल खुळे यांनी तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता गप्पच राहिली. दोन दिवसांपूर्वी शेतातील काम करण्यासाठी हे कुटूंब गावी आले होते. याचदरम्यान पीडितेच्या पोटात दुखू लागले. तिला जिल्हा रूग्णालयात आणून तपासले असता ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. त्यानंतर नेकनुर ठाण्याचे पोउपनि औटे, दीपाली गित्ते यांनी रूग्णालयात जावून तिचा जबाब घेतला. हा जबाब टेंभूर्णी पोलीस ठाण्याला पाठविण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अत्याचाराच्या या घटनेने मात्र जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.