Breaking News

अवैध प्रवासी वाहतुक करणार्या वाहनाला अपघातः१७ जखमी ,५ गंभीर

पेठ (वार्ताहर): येथील अंध्रुटे घाटात अवैध प्रवासी वाहतुक करणा-या जीप क्र एम एच 15 डी एम 5478 वाहनास एका अवघड वळणावर अपघात होऊन 17 प्रवासी जखमी झाले असुन त्यापैकी 5 गंभीर जखमींना पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित आहे,सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद आहेत,असा दावा करणार्या पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या पोलीस पथकाच्या वल्गणेची या अपघाताने चिरफाड केली असून ग्रामिण पोलीस दल तोंडावर पडले आहे.क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतुक करणार्या ग्रामिण भागातील वाहनांचे आयुष्यमान संपलेले असतानाही प्रादेशिक परिवहन आणि ग्रामिण पोलीसांच्या अर्थपुर्ण हितसंबधांमुळे अवैध प्रवासी वाहतुकीला वेसन बसण्याऐवजी प्रोत्साहन मिळत आहे.सात आठ प्रवाशी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या वाहनांमधून दोनपट तीनपट प्रवाशी मेंढरासारखे कोंढून वाहतूक केली जाते,आणि जेंव्हा अपघात होतो तेंव्हा यंञणेंच्या पापाची फळे निर्दोष प्रवाशांना भोगावे लागतात.अंध्रूटे घाटात झालेला अपघात याच जातकुळीतील आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पेठच्या पश्चिमेकडे असणा-या आडगाव परिसरातील प्रवाशांना घेऊन अवैध प्रवासी वाहतुक करणारी जीप क्र एम एच 15 डी एम 5478 हे वाहन जवळपास 18 ते 20 प्रवाशांना घेऊन आडगाव कडे दुपारी 3:30 वाजेदरम्यान निघाली व पेठपासुन अवघ्या 3 कि. मी. वरील अंध्रुटे घाटात एका अवघड वळणावर अज्ञात कारणाने पलटी झाली त्यात असणारे प्रवाशांपैकी 17 जखमी झाले असुन त्यातील भारती भगवान पाडवी (वय 22) रा झाडीपाडा, पांडु रामा दरोडे (वय 68), रा. धानपाडा, विलास शिवराम दरोडे (वय 25), रा. धानपाडा, रविंद्र गायकवाड (वय 28), भगवान वाणी (वय 24) पत्ता समजु शकला नाही हे पाच जण गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यापैकी भारती पाडवी या महिलेचा हात तुटला असुन ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकिय अधिका-यांनी सांगितले तर लक्ष्मीबाई बोरसे (वय 54), नामदेव बोरसे (वय 45), तुळसा राथड (वय 32), दिलीप बोरसे (वय 9), विठ्ठल बोरसे (वय 35), चंद्रभागा बोरसे (वय 30), काजल राथड (वय 3) सर्व रा. बिलकस, अतुल दरोडे (वय 16), हिरामण दुंदे (वय 50), कृष्णा दुदे (वय 55), सर्व रा. धानपाडा, गंगुबाई भोये (वय 65) रा. उंबरपाडा, प्रकाश धुळे (वय 32) रा. आडगाव यांच्यावर ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु असुन पेठ पोलिस ठाण्यात अपघाताची सायंकाळी उशीरापर्यंत नोंद झालेली नव्हती.