Breaking News

प्राध्यापकांच्या संपात तातडीने मार्ग काढा : विखे


शिर्डी प्रतिनिधी

महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्यावतीने गेल्या महिनाभरापासून राज्यस्तरीय बेमुदत संप करण्यात येत आहे. मात्र सरकार नेहमीप्रमाणे या संपाकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. सरकारला या संपाबाबत कोणत्‍याही संवेदना नाहीत, असा थेट आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. संपामध्‍ये हस्‍तक्षेप करुन सरकारने प्राध्‍यापकांच्‍या मागण्‍या मान्‍य करा, अशी मागणीही त्‍यांनी केली.

राज्यातील विविध विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक दि. २५ सप्टेंबरपासून विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. ऐन परिक्षेच्‍या काळात हा संप सुरु असल्‍याने महाविद्यालयातील कामकाज ठप्‍प झाले आहे. शिक्षक-प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवावी, विनानुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातील वेतनव्यवस्था नियमित करावी, शिक्षक समस्या निवारण यंत्रणा निर्माण करावी, बेकायदेशीर कपात केलेले ७१ दिवसांचे वेतन अदा करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी आदी मागण्या प्राध्‍यापक संघटनेच्‍या आहेत. मात्र या प्राध्यापकांच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करत असून संप फोडण्याचे काम सरकार करत असल्‍याची टीकाही विरोधी पक्षनेते विखे यांनी केली.