Breaking News

वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अपघातातील दुचाकीस्वार ठार


अहमदनगर (प्रतिनिधी)- वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने
 अपघातातील दुचाकीस्वारास गमवावे लागलेले प्राण तसेच वाढत्या साथीचे आजाराने ग्रामीण रुग्णालयात असलेल्या अपुर्‍या सुविधेचा निषेध व्यक्त करुन ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याच्या मागणीचे निवेदन यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने जिल्हा रुग्णालयातील आरएमओ एस.के. सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील, महादेव मुंढे, कुमार मुंढे, किरण वाघ, रवींद्र नागरे, ज्ञानदीप पांडुळे, आसिफ शेख, विठ्ठल ढाकणे, अरुण डोंगरे, राजू आगरखे, प्रविण क्षीरसागर, उमेश शेलार आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

शुक्रवार दि.19 ऑक्टोबरच्या रात्री शेवगाव-पाथर्डी रोडवरील डांगेवाडी येथे एका अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला मदत करण्यासाठी रस्त्यावरुन जात असलेले नगरचे रुणाल जरे पाटील, गणेश गवळी, सुरज मोहोळकर, आनंद घोलप, प्रतीक गडवे, संदीप तुपे, पुष्पक गोयल हे युवक धाऊन आले. त्यांनी सदर जखमीस रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलवली, मात्र जवळील 2 किमी अंतरावर असलेल्या पाथर्डीतून रुग्णवाहिका येण्यासाठी पाऊण तास लागला. धक्का मारून सुरू होत असलेल्या या रुग्णवाहिकेत जखमीला टाकण्यात आले व ही रुग्णवाहिका पुन्हा धक्का मारून सुरू करण्यात आली. डिझेल संपल्याने ही रुग्णवाहिका अर्ध्या रस्त्यात बंद पडली. पुन्हा दुसर्‍या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. वेळेवर उपचार न मिळाल्याने सदर अपघातातील जखमीने आपले प्राण सोडले. ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका नागरिकास उपचाराअभावी आपल्या प्राणास मुकावे लागले. तसेच ग्रामीण रुग्णालयात असलेली अस्वच्छता, वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसणे, रुग्णांना नीट वागणुक न देणे, औषधांचा व प्रशिक्षित कर्मचार्‍यांचा अभावाने रुग्णांची हेळसांड होत आहे. ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लूसारख्या साथीचे आजार पसरत असून, तातडीने ग्रामीण रुग्णालयात सेवा उपलब्ध करण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.