Breaking News

खंडेश्वरी मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याचे डांबरीकरण-डॉ.क्षीरसागर.


बीड,(प्रतिनिधी)ः- नवरात्र उत्सवा निमित्त बीड शहराचे ग्रामदैवत असलेल्या खंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून या मंदिराकडे जाणारा रस्ता नव्याने होणार आहे. भाविकांची अडचण लक्षात घेऊन हा रस्ता दोन दिवसात डांबरीकरण करून घेण्याचा निर्णय नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी घेतला आहे. शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. शहरातील लाखो भाविक खंडेश्वरी मंदिर येथे दर्शनानिमित्त मांदियाळी लावत असतात. तीसरी माळ असल्यामुळे भाविकांची गर्दी वाढत आहे. भाविक भक्तांची गैरसोय होवू नये म्हणून खंडेश्वरी देवी संस्थान येथे गुरुवारी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड नगर परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांसह भेट दिली. सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. विशेषतः सध्या सुरू असलेल्या साथींच्या रोगांमुळे मंदिर परिसरात दिवसातून दोनदा धूर फवारणी, वाढीव घंटा गाड्या, हायमास्टचे दिवे व खंडेश्वरी देवी मंदिर ते काळा हनुमान ठाणा हा रोड त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या तसेच दोन दिवसात हा वन लेअर डांबरीकरण करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून तातडीने काम सुरू होणार आहे. या प्रसंगी परिसरातील स्टॉल धारकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन डॉ.क्षीरसागर यांनी केले.यावेळी समवेत श्री खंडेश्वरी ट्रस्टचे रंजितसिंह चौहान, नगरसेवक सम्राट चव्हाण, राजेंद्र बनसोडे, बाबूराव चौरे, राणा चौहान, सुभाष श्रीवास्तव, विक्रम चौहान, आशिष राठोड, फामजी पारीख, विशाल मोरे आदी उपस्थित होते.