Breaking News

किमान वेतनाची थकबाकी द्या-ठामपा सफाई कर्मचारी; व घंटागाडी वाहन चालकांचे बेमुदत उपोषण सुरु


ठाणे : प्रतिनिधी

ठाणे पालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक रस्ते सफाई करणाऱ्या 1500 कर्मचाऱ्यांचा किमान वेतनातील थकबाकी आणि घंटागाडीवरील 400 वाहन चालक याना सफाई कर्मचाऱ्यांच्या एवढे वेतन न देता कुशल कामगारांचे वेतन द्यावे, यंदाचा गणवेश अद्याप नाही, 4 टक्के रक्कम ग्रॅज्युएटी म्हणून ती कर्मचारी यांच्या नावावर ठेवावी या मागणीसाठी म्युनिसिपल कामगार युनियनद्वारे सोमवारपासून पालिका मुख्यालया समोर कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.


ठाणे पालिकेत सार्वजनिक रोडवरील सफाई कर्मचारी यांची 1500 एवढी संख्या आहे. या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी 2015 पासून अक्टोबर 2018 या काळातील किमान वेतन थकबाकी देण्यात आलेली नाही. तसेच घंटागाडी चालक याना सफाई कर्मचाऱ्यांएवढे वेतन देण्यात येते. 400 घंटागाडी कर्मचारी असून त्यांना कुशल कामगारांचे वेतन देण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करण्यात आला असून मुख्यमंत्री, कामगार मंत्री,प्रधान सचिव कामगार विभाग, कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी वेळोवेळी आदेशही दिले. महापालिकेनेही वेळोवेळी किमान वेतनाची थकबाकी देण्याचे मान्य केले. सुमारे 30 कोटीच्या आसपास थकबाकीची रक्कम असून इतर महापालिकेने हि रक्कम पूर्वीच दिलेली आहे. मात्र ठाणे महानगर पालिका चालढकल करीत आहे. याच्याच निषेधार्थ सफाई कर्मचारी आणि घंटागाडी चालकांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ठाणे पालिका सफाई कर्मचारी याना 2018 या वर्षात गणवेश देण्यात आलेला नाही. सफाई कर्मचारी यांच्या करीता 4 टक्के ग्रज्यूएटी म्हणून बाजूला काढून ठेवण्याचे मान्य केल्यानंतर ती रक्कम किती आणि कुठे आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांची किती रक्कम आहे. सदर रक्कम ही कर्मचारी यांच्या नावे युनिव्हर्सल अकाउंट नंबर देवून त्याचा ग्रज्युएटी फंड तयार करून त्या कर्मचारी यांच्या नावावर रक्कम ठेवावी अशा विविध मागण्या कर्मचारी यांच्या असून त्या मान्य होत नाही तो पर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची माहिती महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी दिली.