Breaking News

नवीन पाणी पुरवठा योजनेस तत्वतः मान्यता


कर्जत प्रतिनिधी :

मृद व जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारामुळे आज राशीन ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत १२ कोटी ९४ लाख रुपये खर्चाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेस आज पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी तत्वतः मान्यता दिली.

या योजनेची तांत्रिक मान्यता व इतर कार्यवाही येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश मंत्रीमहोदयांनी यावेळी दिले. या योजनेमुळे राशीनकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. राशीन पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळावी, यासाठी प्रा. राम शिंदे यांच्या विनंतीवरून पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी आज बैठक आयोजित केली होती. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलरासू यांच्यासह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी, राशीनचे उपसरपंच साहेबराव साळवे, राजेंद्र देशमुख, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील मोढळे, भीमराव साळवे, संतोष देवगावकर, विशाल देशमुख, राजेंद्र सावताडे, राहूल राऊत आदी यावेळी उपस्थित होते. राशीन पाणी पुरवठा योजनेमध्ये राशीन गावठाण सह १३ वस्त्यांचा समावेश आहे.