Breaking News

कृष्णा कारखान्याचा गुरूवारी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ

रेठरे बुद्रुक (प्रतिनिधी) : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा सन 2018-19 या गळीत हंगामाचा 59 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.उत्तरा सुरेश भोसले यांच्या हस्तेे गुरूवार, दि. 18 आक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर कारखाना कार्यस्थळावर होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांनी दिली. 

दळवी म्हणाले, गळीतासाठी नोंदविलेल्या संपूर्ण उसाचे गळीत पुर्ण करण्याच्यादृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेची पुर्व तयारी करण्यात आली असून बैलगाड्या, ट्रॅक्टर, अंगद यांच्याशी करार केले आहेत. कारखान्याची ओव्हरऑइलींगची कामे त्याचबरोबर मशिनरीमधील आवश्यक त्या दुरूस्त्या आदी कामे प्रगतीपथावर असून ती अंतीम टप्प्यात आहेत. बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले हे येणार्‍या गळीत हंगामाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

व्हाईस चेअरमन जगदिश जगताप व संचालक मंडळ तसेच मान्यवरांची यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास सभासद, ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांनी केले आहे.