Breaking News

लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने योग करणार्‍या विद्यार्थ्यांना मॅटचे वाटप


अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने हिवरे बाजार येथील योग करणार्‍या विद्यार्थ्यांना मॅटचे वाटप करण्यात आले. आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात लायन्सचे अध्यक्ष हरजितसिंह वधवा, योग विद्या समितीचे श्याम शर्मा, प्राध्यापक अनिरुद्ध भागवत आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पोपट पवार म्हणाले की, केमिकलयुक्त व फास्टफुडचा आहारात समावेश झाल्याने अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. मोबाईल व टीव्हीमुळे विद्यार्थी मैदानी खेळापासून दुरावत चालला असून, त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहे. युवक बलशाली होण्यासाठी योगची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
लायन्सचे अध्यक्ष हरजितसिंह वधवा यांनी समाजातील गरजू घटकांना मदत करण्याबरोबर सक्षम युवा पिढीच्या निर्माणासाठी लायन्स क्लब विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहे. योगाने विद्यार्थ्यांचे मन व शरीर उत्तम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. योग विद्या धामच्या मीरा शर्मा यांनी योगाचे महत्त्व पटवून विविध आसनाचे फायदे प्रात्यक्षिकासह सांगितले. यावेळी लायन्सच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांबरोबर सुर्यनमस्कार केला. याप्रसंगी सचिव संदेश कटारिया, खजिनदार अंजली कुलकर्णी, किरण भंडारी, धनंजय भंडारे, गणेश लड्डा, दिलीप कुलकर्णी, दिलीप देशपांडे, कृष्ण बागडे, दीपक ठाणगे आदी उपस्थित होते