Breaking News

छावणी नको गुरांची नोंदणी करून चारा त्यांच्या दावणीला द्या-कदम


गेवराई (प्रतिनिधी):- निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सतत होणार्‍या वृक्षतोडीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली चिरडून मरण्याची वेळ आली असताना जुलमी सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठी ३१ ऑक्टोंबर च्या मुहूर्ताची वाट पाहत आहे. आणि काही पांढरपेशी मंडळी समाजसेवेचा खुपच कळवळा असल्या सारखे लवकरच गुरांच्या छावण्या सुरू करा अशा मागण्याचा जोर धरू लागली आहे.पण आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पहात आहोत हि पांढरपेशी मंडळी गुरांच्या छावणीतले पशुखाद्य आणि शेण खाऊन एवढी माजली आहे कि ते जसे काय दरवर्षी दुष्काळ पडावा अशी वाटच बघत असतात अशी वेगवेगळ्या ग्रामीण भागात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे सदरील परिस्थिती पाहून आमची मागणी आहे की चारा छावणीला नको तर ज्यांच्याकडे गुरेढोरे आहेत त्यांच्या दावणीला हवा आहे. अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे व स्थानिक तहसीलदारांकडे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे गेवराई तालुका चिटणीस भाई वाल्मिक कदम यांनी दिलेल्या पत्रकाद्वारे म्हटले आहे. दर तीन चार वर्षांनी अनियमित पाऊस कमी झाल्याने सत्तेत असलेल्या पक्षाचे सरकार सोयीनुसार रिकामटेकडे कार्यकर्ते जगविण्यासाठी छावण्याचा अठ्ठाहास करत असते आणि ते वेगवेगळ्या पक्षाचे सरकार त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सदन करण्यासाठी खटाटोप करत असते. ह्या कार्यक्रमात गुरांना चारापाणी न मिळता जे छावणी उभे करतात ते तुपाशी आणि शेतकरी आणि गुरांवर अन्याय होताना नेहमीच पहायला मिळतो. तरी सद्याच्या भाजप / शिवसेना सरकारला जराही शेतकरी आणि गुराढोरांची दया असेल तर येत्या दुष्काळ जाहीर करण्याच्या उद्देशाने सरकारने ग्रामसेवक / तलाठी यांच्या मार्फत सर्व्हे करुनच शेतकर्यांना आणि गुरांना न्याय दिला तर खर्‍या अर्थाने पशुसंवर्धन होईल अशी अपेक्षा भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे गेवराई तालुका चिटणीस भाई वाल्मिक कदम यांनी केला आहे.