Breaking News

अकोल्यात जीवा महाला जयंती उत्साहात साजरी

अकोले (प्रतिनिधी) शहरातील जीवा महाला प्रतिष्ठान, श्री संतसेना नाभिक संघटना व शिवप्रेमी व गडप्रेमी संघटनेच्या सहभागातुन अकोल्यात जीवा महाला जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमीत्ताने मॉडर्न हायस्कुल जवळील चौकाचे जीवा महाला चौक असे नामकरण करून नामफलकाचे अनावरणही करण्यात आले.

शिवव्याख्याते प्रा. एस. झेड. देशमुख व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर प्रा. देशमुख यांनी आपल्या व्याख्यानात शिवरायांनी बहुजनांचे स्वराज्य कसे उभे केले? व त्यांचे अंगरक्षक जीवा महालाचा इतिहास काय होता? याची माहिती उपस्थितांना दिली. याशिवाय डॉ. मनोज मोरे, दिलीप शेणकर सर यांची भाषणे झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य डॉ. किरण लहामटे, मराठा सेवा संघाचे समन्वयक शिवश्री सोमनाथ नवले, दिलीप शहा, भाईर गुरूजी, गुरूकुले सर, संजय भुजबळ, शिवाजी नेहे आदी मान्यवर उपस्थित होते.
जीवा महाला चौकामध्ये जीवाजी महालांचे प्रतिमा पुजन नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेविका सौ.सोनाली नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अर्थवेद पतसंस्थेचे संस्थापक प्रा.बी.एम.महाले, संभाजी ब्रिगेडचे राज्य सचिव डॉ.संदिप कडलग आदी मान्यवर उपस्थित होते. शिवमहोत्सव समितीच्या वतीने सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेणार्‍या कार्यकर्त्यांला जीवा महाला गौरव पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी जीवा महाला प्रतिष्ठान चे अध्यक्ष किरण चौधरी यांना सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन शिवमहोत्सव समितीचे सोमनाथ नवले, डॉ. संदिप कडलग, दिलीप शेणकर, प्रा.एस.झेड.देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
शोभायात्रेचा शुभारंभ संतोष कचरे, रावसाहेब नवले, अण्णासाहेब आढाव व दिलीप शेणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला. शोभायात्रेत भगवे झेंडे घेऊन मॉडर्न हायस्कुल चे विद्यार्थी सहभागी झाले होते. तर ज्ञानवर्धिनी च्या विद्यार्थ्यांनी दांडपट्टा चालविणे, लाठी-काठी खेळणे याची प्रात्यक्षिके करून दाखविली. अगस्ती हायस्कुलच्या विद्यार्थींनीनी ढोलताश्यांचा ताल धरला. अभिनव शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अफजलखानचा वध व शिवरायांचे प्राण वाचवितांना जीवा महाला हा प्रत्यक्ष देखावा सादर केला. गोधाम व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ.गौराम बिडवे यांनी व्यसनाधिनतेमुळे होणार्‍या दुष्पपरिणामांची माहिती देणारा रथ शोभायात्रेत सहभागी केला होता. या रथाचे सर्वांनीच कौतुक केले.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंद्रभान कोल्हाळ यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक रमेश चौधरी यांनी केले. तर आभार किरण चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता जीवा महाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण चौधरी, अमोल कोल्हाळ, महेश भराडे, बाळासाहेब मदने, तुळशिदास सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले.