Breaking News

महाराष्ट्राचा कोळसा इतर राज्यांना दिल्यानेच वीजटंचाई; नवाब मलिक यांचा आरोप


मुंबई : महाराष्ट्राच्या वाटयाला आलेला कोळसा निवडणूका असलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांना देण्यात आल्यानेच राज्याला वीजटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या तीन राज्यांचे हित बघायचे आणि महाराष्ट्राला अडचणीत आणायचे हा भाजपचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेमध्ये केला. राज्यात सुरु असलेल्या अघोषित लोडशेडिंगबाबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये खरपूस समाचार घेतला. त्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा वीज खात्यामध्ये ठेका असून, ऊर्जा खात्यातील चार कंपन्यांचे सल्लागार असलेले विश्‍वास पाठक यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे त्यामुळे त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी मलिक यांनी केली. 

राज्यात अघोषित लोडशेडिंग सुरु असल्याने राज्यात 11-12 तास जनतेला वीज मिळत नाही. सरकारला वीजेची कमतरता भासत होती तर त्यांनी याबाबत जनतेला जाहीरपणे माहिती देणे आवश्यक होते. ती जबाबदारी सरकारची होती मात्र सरकारने तसे न करत अघोषित लोडशेडिंग जाहीर केली आहे. ऊर्जा विभागाने तयार केलेल्या अंतर्गत नोंदीत 20 टक्के मागणीत वाढ आणि 3 हजार मेगावॅटचा तुटवडा असल्याचे या नोंदीत स्पष्ट केले आहे.त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील किती तास वीज मिळणार नाही याची घोषणा करायला हवी होती. माहिती जाहीर करायला हवी होती. परंतु सरकार ही माहिती लपवून ठेवत आहे त्यांना जनतेलावयाची माहिती द्यायची नसून, जनतेला अडचणीत आणायचे आहे असेही मलिक म्हणाले.