Breaking News

वीज भारनियमनात लवकरच तोडगा-ना.मुंडे


परळी (प्रतिनिधी)- शहरात अचानक सुरू झालेल्या वीज भारनियमना संदर्भात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली असून लवकरच यात तोडगा निघणार असल्याचे नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांनी येथे सांगितले. 
एकीकडे जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असतानाच दुसरीकडे महावितरण कंपनीने संपूर्ण जिल्हाभरात पुन्हा भारनियमन सुरू केले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली उन्हाची तीव्रता त्यातच सोमवार पासून सुरू झालेले भारनियमन यामुळे नागरिक चांगलेच मेटाकुटीला येतांना दिसत आहेत. तर दुसरीकडे सुरू होत असलेल्या नवरात्र उत्सवावर या भारनियमनामुळे अंधकाराचे सावट उभे ठाकले आहे. ग्रामीण भागाला या भारनियमनाचा सर्वाधिक फटका बसला असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अचानक सुरू झालेल्या या भारनियमनाची माहिती ना. पंकजाताई मुंडे यांना दिल्यानंतर त्यांनी लगेचच उर्जामंत्र्यांशी चर्चा करून भारनियमन रद्द किंवा ते कमी करावे यासाठी संबंधित यंत्रणेला आदेशित करावे असे सूचित केले आहे. दरम्यान, ना. पंकजाताई मुंडे यांनी यात लक्ष घातल्याने लवकरच याबाबत तोडगा निघून नागरिकांना दिलासा मिळेल असे प्रा. पवन मुंडे यांनी म्हटले आहे.