तलवाडा पोलिसांवर रुबाब झाडणारा तोतया फौजदार गजाआड


तलवाडा (प्रतिनिधी)- नातेवाईकाची फिर्याद नोंदवून घ्या आणि तातडीने आरोपीला अटक करा असे आदेश सोडत रुबाब झाडणार्‍या तोतया फौजदाराचा तलवाडा पोलीस ठाण्याच्या चाणाक्ष पोलिसांनी भांडाफोड केला. यावेळी पोलीस नावाचा उल्लेख असणारी कार, गणवेश आणि ट्रॅकसूट पोलिसांनी जप्त करून या तोतया फौजदाराची रवानगी खर्‍या कोठडीत केली आहे.

बुधवारी तलवाडा पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज सुरु असताना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास संजय उल्हास शिंदे (वय ३५, रा. सोपान नगर, सासवड, जि. पुणे) हा भामटा त्याच्या कारमधून (एमएच १२ ईटी ३५९७) ठाण्यात आला. त्याच्या कारच्या समोरच्या आणि मागच्या काचावर ‘पोलीस’ असे ठळक अक्षरात लिहिले होते. तसेच त्याच्या अंगावरील ट्रॅकसूटवर देखील मराठीमध्ये महाराष्ट्र पोलीस नाव छापलेले होते. पोलीस ठाण्यात येताच संजयने स्वतःची ओळख पोलीस उपनिरीक्षक असल्याची करून देत सध्या पुण्याच्या येरवाडा पोलीस ठाण्यात नेमणुकीस असल्याची बतावणी केली. गेवराई तालुक्यातील मनुबाई जवळा येथील नातेवाईक प्रियंका व्यंकटराव राउत यांची व्यवस्थित फिर्याद घ्या आणि तात्काळ आरोपीस अटक करा असा रुबाब त्याने तलवाडा पोलिसांवर झाडला. परंतु, त्याचे संशयास्पद वागणे आणि उसना रुबाब तलवाडा ठाण्यातील चाणाक्ष पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. त्यामुळे संजयला बोलते ठेवत सहा. फौजदार मारुती माने यांनी सदरील माहिती पोलीस निरीक्षक गवळी यांना दिली. गवळी यांनी तत्काळ येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्याकडे माहिती विचारली असता त्यांनी या संजय शिंदे नावाचा फौजदार त्यांच्या ठाण्यात नसल्याचे स्पष्ट केले.
त्यानंतर तलवाडा पोलिसांनी संजयला विश्वासात घेत त्याची चौकशी सुरु केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलीस निरीक्षक गवळी यांच्या आदेशाने फौजदार मुर्‍हाडे, सहा. फौजदार मारुती माने, पोलीस कर्मचारी बहिरवाळ, रहाटवाड यांनी संजयला घेऊन मनुबाई जवळा येथील त्याचे नातेवाईक आशाबाई व्यंकटराव राऊत यांच्या घराची झडती घेतली. 
झडती दरम्यान घरात पोलीस उपनिरीक्षकाचा खाकी गणवेश, खांद्यावर दोन्ही बाजुला म.पो., दोन्ही बाजुला दोन दोन स्टार, लाल निळी फित, संजय उल्हास शिंदे पोउपनि असे लिहीलेले नेमप्लेट, तसेच खाकी पँन्ट, राजमुद्रेचे चिन्ह असलेला तपकिरी पट्टा आणि तपकिरी रंगाच्या बुटांची एक जोड असा संपूर्ण पोलिसी पोशाख आढळून आला. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले. याप्रकरणी सहा. फौजदार मारुती माने यांच्या फिर्यादीवरून संजय शिंदे या भामट्यावर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget