Breaking News

नाना पाटेकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल


मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यसह आणखी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. 2008 मध्ये हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले होते, असा आरोप तनुश्रीने केला होता. तिच्या तक्रारीची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली. त्यात पोलिसांना कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. बुधवारी रात्री तनुश्रीने पोलीस ठाण्यात जाऊन पाटेकर व अन्य तिघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यात तिचा पाच तास जबाब नोंदवल्यानंतर भादंवि कलम 354 (छेडछाड) व कलम 509 (महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे) या अंतर्गत पाटेकर, आचार्य यांच्यासह चित्रपट निर्माता सामी सिद्दीकी व दिग्दर्शक राकेश सारंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी जबाब नोंदवून न घेतल्यात न्यायालयात जाण्याचा इशारा तनुश्रीचे वकिल नितीन सातपुते यांनी दिला होता. आज वकील सातपुते यांनी 40 पानी पुरावाही पोलीस ठाण्यात सादर केला. तक्रार देताना कोणी ओळखू नये यासाठी तनुश्री बुरखा घालून आली होती.