Breaking News

‘बापूं’च्या विचारांवर काटकसरीने कारभार करू : नागवडे


श्रीगोंदा प्रतिनिधी

बापूंनी {माजी आ. शिवाजीराव नागवडे} हयातभर शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे कार्य केले. सहकारी कारखानदारीत पारदर्शक आणि काटकसरीच्या कारभारासाठी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नागवडे कारखान्याचे नाव घेतले जाते. गेली पाच दशके बापूंनी आदर्शरित्या कारखान्याचे नेतृत्व केले. येत्या काळात बापूंच्या पद्धतीने त्यांच्याच आदर्श विचारांवर कारखान्याचा पारदर्शकपणे आणि काटकसरीने कारभार करू, अशी ग्वाही ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. 

नागवडे कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ आज (दि. १२) पार पडला. कारखान्याचे संस्थापक स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या निधनानंतर कारखान्याचा पहिलाच समारंभ होता. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष असताना बापूंनी खासगी कारखान्याचे सहकारी कारखान्यात रूपांतर केले. सदैव शेतकरी हिताचा विचार मांडला. बापूंची शिकवण आदर्श मानून कारखान्याचा कारभार यशस्वीपणे चालविण्यासाठी आम्ही बांधील आहोत. यावर्षी कार्यक्षेत्रात ऊसाची कमतरता भासणार आहे. येत्या काळात सहकारी कारखानदारी टिकविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. 

ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस म्हणाले, स्व. बापूंनी कायमस्वरूपी सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम केले. हजारो लोकांचे प्रपंच उभे करणाऱ्या कारखानदारीत राजकारण होऊ नये. नागवडे कारखान्याला कोणतीही अडचण आल्यास राजेंद्र नागवडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, केशव मगर, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, जिजाबापू शिंदे, राजू गोरे, राजकुमार पाटील, अरुण पाचपुते, सुनील भोस, सुभाष शिंदे, अनिल पाचपुते, सुरेखा लकडे, अंजली रोडे, लताबाई पाचपुते, विलास काकडे आदी यावेळी उपस्थित होते.