Breaking News

कर्मवीर काळेंचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान : कोकाटेकोपरगाव / प्रतिनिधी

गावागावात व प्रत्येक खेड्यात शाळा येऊन शेतक-यांच्या व कष्टक-यांच्या मुलांना शिक्षण मिळाले, ते फक्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि माजी खा. कर्मवीर शंकरराव काळेंमुळेच. कर्मवीर भाऊराव पाटलांनंतर रयत शिक्षण संस्थेचा व्याप व विस्तार माजी खा. कर्मवीर काळेंनी मोठ्या ताकदीने पेलला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध इतिहास संशोधक, प्रसिद्ध वक्ते व शिवचरित्रकार श्रीमंत शिवाजीराव कोकाटे यांनी केले. 

तालुक्यातील सुरेगाव येथील रयत शिक्षण संकुलातील छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामांदीर व कनिष्ठ महाविद्यालय तसेच छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय सुरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेगाव कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावरील रयत संकुलात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य युवा नेते आशुतोष काळे होते.

अध्यक्षीय भाषणात बोलतांना युवा नेते काळे म्हणाले, की रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य हिमालयापेक्षाही मोठे आहे. कर्मवीरांच्या आदर्श विचारांची शिदोरी सोबत घेवून स्व. शंकरराव काळेंनी कर्मवीर अण्णांनी सोपविलेली रयत शिक्षण संस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. जीवनातील ६० वर्षे रयत शिक्षण संस्थेसाठी खर्च करतांना शिक्षणाचे बाजारीकरण होऊ दिले नाही.

यावेळी कचरू कोळपे, शिवाजी यशवंत वाबळे, संभाजी काळे, सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच सुनील कोळपे, पोलीस पाटील संजय वाबळे, शहाजापूर उपसरपंच बाळासाहेब ढोमसे, वसंत कोळपे, जनार्दन कोळपे, राहुल जगधने, माजी प्राचार्य एन. ए. मते आदींसह विद्यार्थी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य सुखदेव काळे यांनी प्रास्तविक केले. प्राचार्या काकडे सी. ए. यांनी आभार मानले.