Breaking News

लोकसभेच्या 12 जागा न दिल्यास सर्व जागा लढवू; लक्ष्मण माने यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा; चेष्टा चालविल्याची टीका


सातारा (प्रतिनिधी) : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस वारंवार पराभूत होत असलेले लोकसभेचे 12 मतदारसंघ बहुजन वंचित आघाडीला सोडण्याचा प्रस्ताव दिला होता. तथापि दोन्ही मित्र पक्षांनी आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगून आमची चेष्टा सरू केली आहे, तरीही आम्ही भाजप-शिवसेना या मित्र पक्षांसोबत जाणार नाही. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला 12 जागांवर निवडणूक लढविण्याची संधी न दिल्यास बहुजन वंचित आघाडी, एमआयएमसह इतर मित्रपक्ष एकत्र येऊन 48 जागा लढवू, असा इशारा याआघाडीचे प्रवक्ते, माजी आमदार लक्ष्मण माने यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिला. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते आ. राधाकृष्ण विखे-पाटील व राष्ट्रवादीचे आ. अजित पवार यांनी बहुजन वंचित आघाडीने कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव दिला नसल्याचे जाहीर केल्यानंतर माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेने आम्हाला दिलेली आश्‍वासने त्यांचा कार्यकाळ संपत आला, तरी पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे आम्ही शिवसेना-भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी बहुजन वंचित आघाडी व एमआयएम काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ देणार आहोत. दोन्ही पक्षश्रेष्ठी आज जरी आमचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगत असले, तरीही निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांच्या सोबत चर्चा करण्यास तयार आहोत. आमचा प्रस्ताव मान्य न केल्यास आम्ही सर्व जागा लढवू. मग, त्यामध्ये कोणाचा फायदा व कोणाचा तोटा होईल, ते त्या वेळी पाहू.