Breaking News

तिघा अट्टल घरफोड्यांना अटक - 14 घरफोड्याची दिली कबुली


ठाणे : प्रतिनिधी
घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली. या चोरट्यांनी 14 ठिकाणी घरफोडी केल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्यापैकी ठाण्यातील 11 गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी दिली. 

ठाणे, मुंबई परिसरात घरफोडी करणारे अट्टल चोरटे कोपरी भागात येणार असल्याची माहिती ठाणे ठाणे गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहिती नुसार 19 ऑक्टोबर 2018 रोजी पोलीस पथकाने ठाण्यातील कोपरी येथील आनंद सिनेमा भागात सापळा लावून तिघा अट्टल चोरांना अटक केली. रोहित शशिकांत शेवाळे (34, राहणार-कांजूरमार्ग, मुंबई), संजू तंगरात शेट्टी (33, विरार, पालघर) आणि भूषण विजय बांदेकर (24, चारकोप, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. अटक केलेल्या चोरट्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी ठाण्यातील 11 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. तिघे चोरटे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर ठाणे, मुंबई परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी रोहित शशिकांत शेवाळे याच्यावर मुंबई पोलीस आयुक्तालयात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असून तो बऱ्याच दिवसापासून फरार होता. या चोरट्यांच्या ताब्यातून ठाणे परिसरात करण्यात आलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 7 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, अटकेतले आरोपी अट्टल घरफोडे असून त्यांच्याकडून अजून घरफोडीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.