Breaking News

15 वर्षे निवडुन आलेल्या आमदार, खासदारांनी केले काय : डॉ.सुजय विखे


जामखेड ता./प्रतिनिधी
गेल्या पंधरा वर्षांपासून दक्षिण भागातील खासदार तुम्हाला माहित आहे का? या भागाचा विकास नसतानाही तुम्ही त्यांना निवडून देता. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करा असे आवाहन डॉ. सुजय विखे यांनी केले. तालुक्यातील पिंपळगाव आवळा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. 

याप्रसंगी सुधीर राळेभात, बंकटराव बावरकर, करण ढवळे, माजी प स सदस्य विजयसिंह गोलेकर स्वभिमानी शेतकरी संघटनेचे सुनील लोंढे, पोपट गायकवाड, भारत आहेर, संजय उगले, सुनिल शिंदे, भारतराव काकडे, अमोल राळेभात, मकरंद काशिद, अरुण वराट, अरुण वराट, मंजरभाई सय्यद, चंद्रकांत गोलेकर, दस्तगीर शेख, श्रीकांत लोखंडे, प्रमोद बारवकर, हनुमंत वराट शिवाजी ससाणे, सह आदी याप्रसंगी उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, मागील चार दिवसांपासून या भागातील गावांमध्ये जात आहे. सर्वच ठिकाणी प्रश्‍न सारखे आहेत. मग पंधरा वर्षे निवडणून गेलेल्या खासदार आमदारांनी केले काय असा प्रश्‍न उपस्थित करून केवळ निवडणूकीपुरती ही माणसे तुमच्याकडे आली. माझा स्वभाव तसा नाही. राजकारण करायचे तर स्वतःची भूमिका हवी, वेळप्रसंगी प्रश्‍नासाठी पक्षाची बंधने झुगारून लोकांसाठी काम झाले पाहीजे. पण या दक्षिण भागात केवळ मतांसाठी लोकांचा वापर झाल्याची टिका त्यांनी केली. तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले की या भागातील माणसांचा केवळ स्वार्थी राजकारणासाठी वापर झाला. निवडणुका झाल्यानंतर खासदार आमदारांनी या भागातील गावांकडे कधी पाहीलेही नाही. स्वातंत्र्यानंतरही पाण्यापासून ते स्मशानभूमी पर्यंतच्या समस्या कायम आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल तर स्वतःच्या हिमतीवर स्वकर्तृत्वाने युवकांच्या भवितव्याचा विचार करणार्‍या उमेदवारालाच पाठबळ देण्याची भूमिका डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडली. कर्जत, जामखेड तालुक्यातील वाढती गुन्हेगारी अतिशय घातक असून, काही दिवसांपुर्वी झालेली दोन युवकांची हत्या विचार करायला लावणारी आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण राहीले नसून, युवकांच्या भवितव्याचा विचार करणार्‍या स्वतःची भूमिका असलेल्या शिक्षीत उमेदवाराला पाठबळ देण्याचे त्यांनी सूचित केले. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे सांगून यापुढचे सर्व दौरे हे दुष्काळी पाहाणी दौरे म्हणून करणार असून डिजे, फटाके लावून कोणतेही स्वागत न करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.