Breaking News

रेशन दुकानदारांचा 15 नोव्हेंबर रोजी जिल्हा कचेरीवर मोर्चा


बुलडाणा,(प्रतिनिधी): रेशन कार्डधारकांना रोख सबसिडी देण्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ परवानाधारक संघटनेच्या वतीने 15 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठीची बैठक 4 नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात आयोजित करण्यात आली आहे. रोख सबसिडीच्या विरोधात संघटनेने एल्गार पुकारला असून, गत 22 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील 13 तहसीलवर धरणे आंदोलन करण्यात आले. या पाठोपाठ दिवाळी ब्रेक घेऊन संघटना पुन्हा आंदोलनासाठी सज्ज होणार आहे. 

15 नोव्हेंबर रोजी जिल्हा कचेरीवर आयोजित मोर्चाची संघटनेने जय्यत तयारी चालवल्याचे जिल्हाध्यक्ष राजेश अंबुसकर, उपाध्यक्ष सुनील बरडे यांनी सांगितले. या मोर्चाचे नियोजनासाठी रविवार, 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता बुलडाण्यात बैठक आयोजित केली आहे. या मोर्चात दुकानदारांसोबत रेशनकार्ड धारक, आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक यांचाही समावेश असावा. या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक दुकानदाराने किमान 50 ग्राहक मोर्चात आणावे, अशी सूचना देण्यात आल्याचे या वेळी जिल्हा सचिव मोहन जाधव यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले.