Breaking News

सातारा शहरातील 2 हजार दूरध्वनी कनेक्शनचे स्थलांतरणाचे काम सुरु


सातारा (प्रतिनिधी) : भारत संचार निगम लिमिटेडतर्फे सुमारे दोन हजार दूरध्वनी कनेक्शनच्या स्थलांतराचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे काही वेळा दूरध्वनी सेवा विस्कळीत होत आहे. त्यामुळे बीएसएनएलने रविवार पेठेत नव्याने यंत्रणा उभारली आहे. ग्रेडसेपरेटरच्या खोदकामात दूरध्वनी सेवेच्या वाहिन्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी यंत्रणेद्वारे दोरखंडाने वायर बांधून ठेवण्यात येतात.

पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी खोदकाम सुरू असताना काही वेळेला यंत्राचा धक्का रस्त्यामधून जाणार्‍या दूरध्वनीच्या वायरला बसतो. त्यामुळे पोवई नाका, बसस्थानक तसेच राजपथावरील ग्राहकांची दूरध्वनी यंत्रणेची सेवा कोलमडत असते. ग्रेड सेपरेटरचे काम करणारी यंत्रणा व बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांच्यामध्ये समन्वय असल्याने आतापर्यंत विस्कळीत झालेली यंत्रणा एक-दोन दिवसांत सुरळीत होते. ग्रेड सेपरेटरच्या कामाची गती वाढविण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून थोडे पुढच्या अंतरावर तसेच पोवई नाका ते पंचायत समितीच्या कार्यालयापर्यंत खोदकाम सुरू आहे. या खोदकामात दगड, माती ठिसूळ झाल्यानंतर ती काही वेळा बीएसएनएलच्या केबलवर आदळते. त्यामुळे दूरध्वनीच्या केबल तुटतात. गेल्या आठवड्यापासून सुमारे 400 ते 500 ग्राहकांची दूरध्वनी विस्कळीत झाली आहेत. ही सर्व कनेक्शन पूर्ववत करण्यासाठी बीएसएनएलने 2 अधिकारी व सुमारे 15 कर्मचारी रात्रंदिवस कामाला लावले आहेत. बीएसएनएलद्वारे पुरविण्यात येणारी दूरध्वनीची कनेक्शन अमर्याद दिवस खंडित होऊ नये, यासाठी रविवार पेठेत एक स्वतंत्र कार्यालय उघडण्यात आले आहे. तेथील यंत्रणेद्वारे वाहिन्या स्थलांतरीत करण्याचे काम सुरु आहे.