Breaking News

कराड पोलिसांकडून 3 लाखांचा दारुसाठा नष्ट


कराड (प्रतिनिधी) : येथील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात वर्षात अवैध दारू अड्ड्यावर कारवाई करून 3 लाख 43 हजार 334 रूपयांचा दारूसाठा हस्तगत करण्यात आला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या आदेशाने हा दारूसाठा पोलिसांनी पंचांसमक्ष नष्ट केला. कराड तालुक्याच्या हद्दीतील निर्जनस्थळी हा साठा नष्ट करण्यात आल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक अशोकराव क्षीरसागर यांनी दिली. 

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू व्यवसायांवर कारवाई करण्यात येते. 2012 मध्ये 6 ठिकाणी अवैध दारू पकडून 33 हजार 456 रूपयांचा साठा हस्तगत करण्यात आला होता. 2013 मध्ये 7 ठिकाणी छापा टाकून 23 हजार 802 रूपयांचा मुद्देमाल, 2014 मध्ये सात ठिकाणी छापा टाकून 16 हजार 174 रूपयांचा, 2015 मध्ये दहा ठिकाणी छापा टाकून 22 हजार 913 रूपयांचा, 2016 मध्ये 25 ठिकाणी छापा टाकून 1 लाख 28 हजार 90 रूपयांचा, 2017 मध्ये 23 ठिकाणी छापा टाकून 67 हजार 643 रूपयांचा, 2018 मध्ये जुलैअखेर 37 हजार 430 रूपयांचा दारूसाठा हस्तगत केला. हा साठा पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात सीलबंद ठेवण्यात आला होता. तो साठा नष्ट करण्याची परवानगी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे पोलिसांनी मागितली होती. न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये व पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा साठा निर्जनस्थळी पंचांसमक्ष नष्ट करण्यात आला. हवालदार सोनावणे, सपकाळ, चव्हाण, माळी यांनी सहभाग घेतला.