Breaking News

विरोधी पक्षनेते म्हणजे खोटे बोलणार्‍या ’एके-47’ सारखे : पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही विरोधी पक्षनेते म्हणजे खोटे बोलणार्‍या एके-47 असल्याचा आरोप केला आहे. वंशपरंपरेने आलेले राज्यपद सांभाळण्यासाठी ते खोटारडेपणाचे हत्यार वापरत आहेत. मात्र, भाजपने वंशपरंपरा तोडून बदल घडवून आणला आहे, अशा शब्दांत मोदींनी नाव न घेता काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला.

मोदी पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, की विरोधी पक्षांच्या खोटारडेपणाची चिंता करण्याचे कारण नाही. लोकांनाही आता खरे काय आणि खोटे काय हे कळू लागले आहे. त्यांना चांगले काम आणि वाईट कामातील फरक समजतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केवळ सरकाची चांगली कामे आणि सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, तेवढेच पुरेसे आहे. त्यांनी नरेंद्र मोदी अ‍ॅपचाही वापर करण्याविषयीही सांगितले. या अ‍ॅपमुळे पंतप्रधान तुमच्या खिशात राहतील आणि तुम्हाला सरकारच्या सर्व योजनांविषयी माहिती मिळेल, असेही सांगितले. 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या विरोध वाढत चालला आहे. हे सर्व पक्ष भाजप विरोधात एकत्र येत आहेत. मात्र, ते चित्रविचित्र टिप्पणी आणि घोषणा देऊन स्वतःचेच हसे करून घेत आहेत, असे मोदी म्हणाले. विरोधी पक्षांवर टीका करताना मोदी म्हणाले, की विरोधी पक्षांचे काही नेते खोटे बोलणारे मशीन आहेत. त्यांनी तोंड उघडले की, त्यातून खोट्याचा वर्षाव होतो. मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा खोटारडेपणाचा बुरखा फाडावा आणि खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी.