Breaking News

75 टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान असलेल्या मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करणार


चिखली,(प्रतिनिधी): चिखली विधानसभा मतदार संघातील 75 टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडलेल्या मंडळांमध्ये राज्य शासनाकडून लवकरच दुष्काळ जाहीर केला जाणार आहे. भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले यांनी मुंबई येथे मंत्रालयात 31 ऑक्टोबर रोजी ना. पाटील यांची भेट घेऊन दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करणारे निवेदन सादर केले होते. या प्रसंगी झालेल्या चर्चेत चंद्रकांतदादा पाटील यांनी हे आश्‍वासन दिले. 27 ऑक्टोबर रोजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे मंडळ निहाल सर्व्हे करण्याची मागणी महाले यांनी केली होती. त्यानुसार चिखली व बुलडाणा या दोन्ही तालुक्यांचा समावेश पुढील यादीत होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे महाले यांनी म्हटले आहे. या वर्षी चिखली मतदारसंघात सरासरी पेक्षा खूपच पाऊस झाला. परिणामी दोन्ही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला. येथील जलाशयांचा पाणीसाठा देखील घटला असून पेयजल व सिंचनासाठी पाणी कमी पडत आहे. गुरांना पुरेसा चारा नसल्याने परिस्थिती आणखीच भीषण झाली आहे. 27 ऑक्टोबर रोजी दुष्काळी दौर्‍यानिमित्त कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत जिल्ह्यात आले असता श्‍वेताताई महाले पाटील यांनी त्यांची भेट घेतली. चिखली व बुलडाणा तालुक्यातील मंडळांचा सर्व्हे करण्याची मागणी त्यांनी ना. खोत यांच्याकडे केली होती. सदाभाऊंनी सुध्दा दोन्ही तालुक्यात मंडळ निहाय सर्व्हे करण्याचे निर्देश दोन्ही तहसीलदारांना दिले होते.