Breaking News

जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना गोवर-रुबेला लसीकरण


बुलडाणा,(प्रतिनिधी): गोवर आणि रुबेलापासून बालकांचे रक्षण करणार्‍या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा उदया, मंगळवार, दि.27 नोव्हेंबर 2018 पासून जिल्हयात प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ही लस दिली जाणार आहे. ही लस अतिशय सुरक्षित असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाही. जरी बालकाला ही लस यापूर्वीच टोचण्यात आली असली तरी त्याला ही लस जरुर टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

या मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून लसीकरण मोहिम पाच आठवडे चालणार आहे. शाळा, अंगणवाडी केंद्र आणि सरकारी आरोग्य केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे. सुरूवातीला दोन आठवडे ही मोहिम शाळांमधून राबविण्यात येणार आहे. शाळांमधून पुर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यांमध्ये शाळेत न जाणार्‍या लाभार्थ्यांसाठी ग्रामीण व शहरी भागात मोहिम राबविली जाईल. गोवर हा प्राणघातक रोग आहे ज्याचा प्रसार विषाणुव्दारे होतो. गोवरमुळे विविध प्रकारची गुंतागुंत होऊन बालकांचा अकाली मृत्यु होऊ शकतो. तर रुबेला हा संसर्गजन्य रोग असून त्याचा प्रसार विषाणुमुळे होतो. त्याची लक्षणे गोवरसारखीच असतात. त्याचा संसर्ग मुले आणि मुली दोघांनाही होतो. तथापि, गर्भवती महिलेला गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात रुबेलाचा संसर्ग झाला तर त्याचा परिणाम जन्मजात रुबेला सिंड्रोममध्ये होऊ शकतो. ज्याचे परिणाम गर्भासाठी आणि नवजात शिशुसाठी घातक ठरु शकतात. सदर दोन्ही आजारांचे उच्चाटन करण्यासाठी 27 नोव्हेंबर 2018 पासून जिल्ह्यात गोवर व रूबेला एकत्रित लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 7 लाख 7 हजार 202 इतके अपेक्षित लाभार्थी आहेत.

लसीकरण बुथ प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, उपकेंद्र, शाळा, अंगणवाडी, मदरसा, नियमित आरोग्य सेवा सत्र इत्यादी ठिकाणी घेतली जातील. यासाठी 3 हजार 476 शाळा, 2 हजार 427 बाह्य सत्र ठिकाणे, विशेष टिमद्वारे 142 ठिकाणी, नियोजित सत्रांमध्ये 2010 ठिकाणी लसीकरण होणार आहे. मोहिमेचा शुभारंभ 27 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता जि.प अध्यक्षा सौ. उमाताई शिवचंद्र तायडे, उपाध्यक्षा सौ. मंगलाताई संतोष रायपूरे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्रशाला, बुलडाणा येथे होणार आहे. मोहिमेमध्ये लसीकरण करून गोवर आणि रूबेला या दोन आजारांपासून बालकांना सुरक्षित करू शकतो. यापूर्वी गोवर-रूबेला लस दिली असेल, तरीही त्यांना अतिरिक्त डोस द्यावयाचा आहे. एकाच लसीद्वारे बालकांमधील (9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील) दोन आजारांचे प्रमाण कमी होऊन बालक व त्यांचे भविष्य दोन्हीही सुरक्षित राहणार आहेत. त्यामुळे बालकांना सदर लस अवश्य टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.