Breaking News

नेवासा शहरातील अडीच कोटींची कामे पुन्हा मार्गी लागणार : बर्डे


नेवासा/प्रतिनिधी
नेवासा नगरपंचायतीची स्थापनेनंतर आ.बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रयत्नाने प्राप्त झालेला सन 2015-16 साली वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील 5 कोटीचा निधी पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याकारणाने काही अंशी परत गेला होता व हा अखर्चित निधी वापरण्यासाठी आ. मुरकुटे यांनी मुदतवाढ मिळवण्यास यश मिळवल्याने नेवासा शहरातील अडीच कोटीची कामे पुन्हा मार्गी लागणार आहेत. अशी माहिती नगराध्यक्षा संगीता बर्डे यांनी दिली.

नेवासा नगरपंचायतीला स्थापनेबरोबर 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र त्याचे प्रस्ताव करण्यासाठी व मार्गी लावण्यासाठी पूर्ण वेळ मुख्याधिकारीच नसल्याने स्मशानभूमी, भुयारी गटारी ही कामे घेण्यात आली होती. पण उर्वरित निधीतून संपूर्ण शहरात एलईडी व हायमॅक्सची हाती घेण्यात आलेली कामे शासकीय परिपत्रकानुसार कामे रद्द करण्यात आल्याने यातील अडीच कोटीचा निधी तांत्रिक अडचणीने शिल्लक राहिला. हा शिल्लक राहिलेला निधी शासनाने देखील अखर्चित म्हणून पुन्हा शासनाकडे परत करण्याचे आदेश नगरपंचायतीस मिळाले होते. या आदेशामुळे नेवासा व्हिजनमधील कामांना खिळ बसणार होती. पण आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी सदरील निधी वापरण्यासाठी पुन्हा मुदत वाढ मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यानुसार सदरील निधी खर्च करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ मिळवण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे आता या निधीतून संपूर्ण शहरात भुयारी गटारी, मुस्लीम शादीखाना ही कामे पूर्ण होणार असल्याचे संगीता बर्डे यांनी सांगितले. आ. मुरकुटे यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याने नेवासा शहराच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ. मुरकुटे यांचे अभिनंदनाचा ठराव 
करण्यात आला असल्याचे संगीता बर्डे यांनी सांगितले.