Breaking News

बायपासवर वाहतुक पोलीसांची चिरीमिरी ना.मुंडेच्या मामांकडूनच फोटो व्हायरल


बीड, (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील धुळे-सोलापूर महामार्गावर बीडचे वाहतूक पोलीस मनमानी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दस्तरखुद्द पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनीच सदर प्रकार उघडकीस आणल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान महाजन यांना आलेला अनुभव सामान्या वाहन चालकांना आणि येथील नागरिकांना नेहमीच येतो. सदरील प्रकारामुळे वाहतुक पोलिसांच्या कारभारीची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत.

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनीच वाहतुक पोलिसांचे फोटो व्हायरल केले आहेत. आज सकाळी महाजन औरंगाबादकडून उस्मानाबादकडे जात असतांना बीड-बायपासला हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. बीडच्या जवळ काही वाहतूक पोलीस वाहने अडवत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी या प्रकाराची विचारणा केली असता, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, बीड शहरातील वाहतूक पोलीस शहराबाहेरील धुळे-सोलापूर महामार्गावर चारचाकी वाहने अडवून वाहनांना रेडियम बसवतात. एवढेच नाही तर वाहनांना रेडियम असूनही वाहतूक पोलीस बळजबरीने ते विकत घ्यायला लावतात. अशी माहिती एका ट्रक ड्रायव्हरने महाजन यांना दिली. वाहतूक पोलिसांच्या या प्रकाराची माहिती समजताच त्यांनी या गोष्टीची पडताळणी केली. त्यावेळी चौकशी केली तर बीडचे वाहतूक पोलीस त्या व्यावसायिकांना बरोबर घेवून चक्क १० रुपयांचे रेडीयम २०० ते २५० रुपयांना विकतात असल्याचे समोर आले. हा संपूर्ण प्रकार नियमांना डावलून केला जात असताना देखील बीडचे पोलीस अधिक्षक याकडे दुर्लक्ष का करत आहेत? असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला.